भिवापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंग ही आयुध सर्वत्र वापरल्या जात आहे. मात्र आता शासनाने कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध करून दिल्याने तालुक्यात सध्या ‘मिशन लसीकरण’ मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ५,१०२ जणाचे लसीकरण करण्यात आले आहे. शासनाकडून त्यासाठी जनजागृती सुरू आहे. दुसरीकडे नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. तालुक्यात सध्या स्थितीत सहा ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भिवापूर ग्रामीण रुग्णालय, सोमनाळा, नांद, जवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व मेढा, सालेशहरी आरोग्य उपकेंद्रात कोविड प्रतिबंधित लसीकरण सुरू आहे. तालुका आरोग्य विभागाला पहिल्या टप्यात ११,७७२ जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट दिले होते. यात ६० वर्षावरील ११,२४१ तर विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षावरील ५३१ जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले होते. त्यापैकी २२ मार्चपर्यंत ५,१०२ महिला व पुरुषांनी लसीकरणाचा स्वयंस्फूर्तीने लाभ घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत यात वाढ होणार यात शंका नाही. महत्त्वाचे म्हणजे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही बोलल्या जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील वयोगटातील सर्वांना लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहनही प्रशासनाकडून होत आहे.
बेसूर, कारगाव उपकेंद्रात सुविधा
सध्या स्थितीत तालुक्यात केवळ सहा ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. येत्या दोन, चार दिवसात कारगाव व बेसूर येथेसुद्धा लसीकरणाचे केंद्र सुरू होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत यांनी दिली.
लस सुरक्षित
सुरुवातीला कोविड प्रतिबंधित लसीबाबत अनेक समज-गैरसमज जनमानसात होते. मात्र लसीकरणाने तर एकमेकांनी शेअर केलेले अनुभव पॉझिटिव्ह असल्यामुळे लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत आहे. लस घेतल्यानंतर काहींना हलका ताप व जडपणा आल्यासारखे झाले. त्यासाठी आरोग्य विभागाने त्यांना काही गोळ्या दिल्यात. काहींना तर लसीकरणानंतर कुठलाही त्रास झालेला नाही. एकंदरीत कोरोना प्रतिबंधित लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे मत तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, डॉ. प्रणीण राऊत, ठाणेदार महेश भोरटेकर, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी व्यक्त केले.