पराभव समोर दिसत असल्याने मोदींचा तोल गेला : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:57 PM2019-04-05T23:57:42+5:302019-04-06T00:00:22+5:30
पराभव समोर दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तोल गेला आहे. ते वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नसल्याने ते आता धमक्या देत फिरत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पराभव समोर दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तोल गेला आहे. ते वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नसल्याने ते आता धमक्या देत फिरत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
भंडारा-गोंदिया लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पाटील नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पाच वर्षांत काय केले त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. याकरिता ते पवारांना लक्ष्य करीत आहेत तर दुसरीकडे हिंदुत्वाची हाक देत आहेत. आजवर पंतप्रधान आपल्या भाषणात त्यांनी काय केले आणि भविष्यात काय करणार हे सांगत होते. परंतु मोदी फक्त इतरांची उणीदुणी काढत फिरत आहेत. त्यांनी वेगळाच पायंडा पाडला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ते शेतमालाला दुप्पट हमी भाव देऊ, युवकांना रोजगार देऊ, महागाई, भ्रष्टाचार रोखू अशा भरमसाट घोषणा मागील निवडणुकीच्या पूर्वी केल्या होत्या. यापैकी काहीच केले नाही. त्यांचे महाराष्ट्रातील चेलेही तेच काम करीत आहेत. मोदींच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचे दिसून येते, असेही जयंत पाटील म्हणाले.
गरीबांना ७२ हजार रुपये देण्याची घोषणा ही व्यवहारी आहे. रघुराम राजन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतरच ही घोषणा करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसादही लाभत आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांची वाटही बघितली. मात्र त्यांनी नकार दिला. त्यांच्या एकाही उमेदवाराला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. एकूणच परिस्थिती झपाट्याने काँंग्रेस आघाडीच्या बाजूने अनुकूल होत असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, अनिल अहीरकर, बाबा गुजर, ईश्वर बाळबुधे, प्रवीण कुंटे, शब्बीर विद्रोही आदी उपस्थित होते.
... म्हणून पवारांवर मोदींची टीका
भाजपविरोधी महाआघाडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. सर्वांना एकत्र आणण्याचे कसब त्यांच्यात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करीत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.