सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : आरोपी डॉक्टर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 10:16 PM2021-04-27T22:16:05+5:302021-04-27T22:24:45+5:30
Molestation, woman doctorकोविड हॉस्पिटलमध्ये नव्यानेच रुजू झालेल्या एका महिला डॉक्टरवर तेथील सिनिअर डॉक्टरने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड हॉस्पिटलमध्ये नव्यानेच रुजू झालेल्या एका महिला डॉक्टरवर तेथील सिनिअर डॉक्टरने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली. नंदू रहांगडाले (वय ३९) असे आरोपी डॉक्टरचे नाव असून तो अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हिल टॉप परिसरात राहतो.
मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मोठ्या खासगी इस्पितळात तो नोकरीला आहे. १० दिवसांपूर्वी याच हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिला डॉक्टर नोकरीला लागली. ती सोमवारी रात्री इस्पितळात कर्तव्यावर असताना आरोपी डॉ. नंदूने तिला चेंजिंग रूममध्ये बोलावले. तेथे तिच्याशी त्याने लगट सुरू केली. या अनपेक्षित प्रकारामुळे डॉक्टर हादरली. आरोपी डॉक्टरचा तीव्र प्रतिकार करून ती चेंजिंग रूममधून बाहेर पडली. त्यानंतर ती रुग्णालयातून सरळ घरी गेली. तत्पूर्वी, आरोपी डॉक्टरने हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची आणि नोकरीवरून काढण्याची तिला धमकी दिली. दरम्यान, ती घरी पोहोचली. तेव्हा अत्यंत घाबरलेली दिसल्यामुळे घरच्यांनी तिला विचारपूस केली असता तिने आपल्या पालकांना झालेली घटना सांगितली. पालकांनी तिला मानकापूर पोलीस ठाण्यात नेले. तेथे महिला डॉक्टरने पोलिसांसमोर आपबीती कथन केली. ठाणेदार वैजयंती मांडवधरे आणि पोलिस उपनिरीक्षक संतोष श्रीरामवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालय गाठले. प्राथमिक चौकशीनंतर आरोपी डॉक्टरला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. महिला डॉक्टरची तक्रार नोंदवून त्याच्याविरुद्ध विनयभंग तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.
डॉक्टरला पोलीस कोठडी
डॉक्टर नंदूला पोलिसांनी आज न्यायालयात हजर करून त्याचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.