नागपूर : वन विभागाची टीम गोरेवाड्याला लागून असलेल्या माहुरझरी भागात पाण्यात अडकलेल्या माकडांना सुरक्षित काढण्याची तयारी करीत आहे. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून माहुरझरीचा खालचा भाग जलमय झाला आहे. या भागात हायटेंशन विजेचे टॉवर आहे. या टॉवरला लागून अनेक वृक्ष आहेत. येथील झाडांवर ७ ते ८ माकडे अडकलेली आहेत. त्यांना मंगळवारी सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सोमवारी माकडांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाची टीम बोट घेऊन पोहचली. परंतु माकडे बोटीवर बसतील किंवा नाही, याबाबत शंका होती. हा भाग जलमय झाला असला तरी येथे माकडांसाठी पर्याप्त भोजनाची व्यवस्था आहे. जलमय भागातून सुरक्षित स्थळ २०० फुटांवर आहे. अशा स्थितीत माकडांना काढण्यासाठी घाई न करता, त्यांना सावधानी बाळगून सुरक्षित स्थळावर आणण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी प्लास्टिकचे ड्रम व तराफे आणले जात आहे. ड्रम व तराफ्याच्या मदतीने बोटी तयार करण्यात येणार आहे. या बोटी सुरक्षित स्थळापर्यंत विशिष्ट अंतरावर ठेवण्यात येईल. या बोटीद्वारे माकड सुरक्षित स्थळी पोहचतील, असे वनविभागाला वाटते.
- गोसेखुर्दमध्ये ४० माकडांना सुरक्षित स्थळी पोहचविले होते
चार वर्षापूर्वी गोसेखुर्दच्या बॅक वॉटरमध्ये ४० माकडं अडकली होती. या ४० माकडांना रेस्क्यू करण्यासाठी बोटी तयार करण्यात आल्या होत्या. बोटीच्या मदतीने माकडांना सुरक्षित स्थळावर आणण्यात आले होते.