लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भात जूनच्या मध्यात ( १५ च्या जवळपास ) मान्सून धडकण्याची शक्यता आहे. मान्सून ढगांच्या गतीवर सर्वकाही अवलंबून आहे. अनेकदा ते एकाच ठिकाणी बरेच दिवस तळ ठोकून असतात. विशेष म्हणजे स्कायमेटने केरळमध्ये मान्सून पोहचल्याची घोषणा केली आहे. परंतु हवामान विभागातर्फे अधिकृत घोषणा झालेली नाही.नागपुरात एक दिवसापूर्वीच पारा ५ डिग्रीने खाली आला होता, तोच सोमवारी पुन्हा ५.६ डिग्री सेल्सिअसने वाढलेला आहे. शहरातील कमाल तापमान ४४.४ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. ढगांमुळे आर्द्रताही सामान्यपेक्षा अधिक होती. परिणामी नवतपाच्या चौथ्या दिवशी उकाड्याने नागरिकांना त्रासून सोडले होते. इतकेच नव्हे रात्रीचे तापमानही ५.३ डिग्रीने वाढून २८.३ डिग्रीवर पोहोचले आहे. २४ तासातच तापमनात होत असलेल्या या बदलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.दुसरीकडे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारी पारा ४६ डिग्रीवर पोहोचला. यात अकोला ४६.९ डिग्री, वर्धा ४६.५ डिग्री, अमरावती ४६.४ डिग्री नोंदवण्यात आला. सामान्यापेक्षा चार ते पाच डिग्री सेल्सिअस अधिक तापमान असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. हवामान विभागानुसार विदर्भात येत्या ४८ तासात कडक उन पडेल. अर्ध्यापेक्षा अधिक विदर्भात ही स्थिती राहील. नागपुरात येत्या दिवसात कडाक्याच्या विजेसह पाऊस होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.सोमवारी यवतमाळमध्ये ४५.५, चंद्रपूरमध्ये ४५.४, ब्रह्मपुरी ४५, वाशिम ४४.२, गडचिरोलीमध्ये ४४, गोंदियात ४३.२ आणि बुलडाणा येथे ४३ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमनाची नोंद करण्यात आली.