मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला महिन्याचा कालावधी लागणार असून, यावर राज्य शासन निर्णय घेणार आहे. मिहानमधील ५० टक्के जागा कंपन्यांना दिली आहे. एव्हिएशन क्षेत्रातील सहा कंपन्यांचे बांधकाम सुरू असून, मिहानचा विकास वेगाने होत असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
यावर्षी १० कॉकपीट तयार होणाररिलायन्सच्या प्रकल्पात फाल्कन-२००० या बिझनेस जेटसाठी लागणारे कॉकपीट तयार होऊन फ्रान्सला पाठविण्यात आले आहे. यावर्षी १० कॉकपीट आणि सुटेभाग तयार होणार आहे. प्रकल्पात दोन वर्षांत विमानांची प्रत्यक्ष निर्मिती होईल. कंपनीने जमीन दिल्यापासून सहा महिन्यात बांधकाम पूर्ण केले. या ठिकाणी नागपुरातील तंत्रज्ञ काम करीत आहेत. १२ वी पास विद्यार्थ्यांना गरजेनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. रिलायन्सच्या पलीकडे नवीन टॅक्सीवेचे काम सुरू आहे.
पतंजलीचे प्रत्यक्ष उत्पादन सहा महिन्यांतमिहानमधील पतंजली प्रकल्पात सर्वाधिक युवकांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्प उभारणीचे काम वेगात आहे. मशीनरी लावण्यात आली आहे. तीन महिन्यात ट्रायल रन आणि सहा महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे.
बांधकाम सुरू करण्याची परवानगीमिहानमध्ये एमएडीसीतर्फे कंपन्यांना बांधकाम करण्यासाठी २४ तास ते १५ दिवसांत परवानगी देण्यात येते. १५ दिवसांपर्यंत परवानगी न मिळाल्यास कंपनीला बांधकामाला सुरुवात करता येते. लहान प्लॉटला एक वर्ष आणि मोठ्या प्लॉटला आठ वर्षांपर्यंत बांधकामाची मुभा आहे.
एव्हिएशन क्षेत्रातील १० कंपन्यामिहानमध्ये एव्हिएशन क्षेत्रातील १० कंपन्यांनी जागा विकत घेतली असून, सहा कंपन्यांची कामे सुरू आहेत. एअर इंडियाचा एमआरओ सुरू आहे. याशिवाय इंदमार, रिलायन्स, थॅलिस टारगिस अॅण्ड गिलॉर्ड या कंपन्यांची कामे वेगात सुरू आहे. याशिवाय लुपिन, झिम लेबॉरेटरीज, आर्कोलाईफ सायन्स या फार्मा कंपन्यांनी जागा घेतली आहे. लुपिनचे उत्पादन सुरू आहे. सूरज आयकेअरचे आणि दोन अन्य कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. रुग्णांना लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचे मिहानमध्ये उत्पादन होणार आहे. त्याकरिता एका कंपनीचे २० लाख चौरस फुटात बांधकाम सुरू आहे. देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी मिहानमध्ये येणार असून, ५० एकर जागा दिली आहे. सर्व प्रकारची आयटी उत्पादने कंपनी मिहानमध्ये तयार करणार आहे.