कस्तूरचंद पार्कमधील स्मारकाला कुंपण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:33 PM2020-06-26T22:33:11+5:302020-06-26T22:36:23+5:30
वारंवार होणारे अतिक्रमण व नुकसान टाळण्यासाठी हेरिटेज कस्तूरचंद पार्कमधील स्मारकाला कुंपण घालणे आवश्यक आहे, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष मांडली. तसेच, यासंदर्भात १९ जून रोजी महानगरपालिकेला पत्र पाठविल्याची माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारंवार होणारे अतिक्रमण व नुकसान टाळण्यासाठी हेरिटेज कस्तूरचंद पार्कमधील स्मारकाला कुंपण घालणे आवश्यक आहे, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष मांडली. तसेच, यासंदर्भात १९ जून रोजी महानगरपालिकेला पत्र पाठविल्याची माहिती दिली.
निराश्रित व्यक्ती ऊन व पावसापासून वाचण्यासाठी कस्तूरचंद पार्कमधील स्मारकात येऊन राहतात. हाकलून लावल्यानंतरही ते परत-परत येतात. त्यांच्यापासून स्मारकाला धोका निर्माण होऊ नये याकरिता कुंपण घालणे आवश्यक आहे. स्मारकावर लक्ष ठेवण्यासाठी सदर पोलीस सतत गस्त घालत असतात. भविष्यातही नियमित गस्त घातली जाईल. अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेला मागणीनुसार पोलीस संरक्षण पुरविले जाते. यापुढेही मनपा अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तमान परिस्थितीची माहिती दिली. कस्तूरचंद पार्कवर मेट्रो रेल्वेशी संबंधित विविध कामे सुरू आहेत. महानगरपालिकाही विकासकामे करीत आहेत. तसेच, जॉगिंग व सायकल ट्रॅक आणि वृक्षारोपणाकरिता सोलर इंडस्ट्रीज इंडियाला परवानगी देण्यात आली आहे असे न्यायालयाला सांगण्यात आले. याविषयी न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे सुनावणी ३० जूनपर्यंत तहकूब करण्यात आली.