लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोटाबंदीनंतर बनावट नोटांचे प्रमाण कमी होईल, असे दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पाचशे व दोन हजारांच्या बनावट नोटा बँकांकडे येत असल्याचे दिसून येत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ‘एसबीआय’कडे (स्टेट बँक आॅफ इंडिया) १४ हजारांहून अधिक बनावट नोटा जमा करण्यात आल्या. यात सर्वाधिक प्रमाण पाचशे व दोन हजारांच्या नोटांचे होते. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘एसबीआय’कडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत बँकेत किती बनावट नोटा जमा झाल्या, किती कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचारासाठी कारवाई झाली, किती बँकखात्यांवर कुणाचाही दावा झालेला नाही, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. ‘एसबीआय’कडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, वर्षभरात १४ हजार ७५४ बनावट नोटा आढळून आल्या. यात पाचशे रुपयांच्या ९,४५३ तर दोन हजारांच्या १३६८ बनावट नोटांचा समावेश होता. बनावट नोटांच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली रक्कम ही ८७ लाख ८९ हजार २०० रुपयांची आहे.या कालावधीत ‘एसबीआय’मध्ये गैरप्रकारांची प्रकरणेदेखील समोर आली. यासाठी १२९ कर्मचाºयांवर कारवाई करत त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले.
विलिनीकरणानंतर १८०० शाखा बंद‘एसबीआय’मध्ये सहा शाखांच्या विलिनीकरणानंतर १८०५ शाखा बंद करण्यात आल्या. ३१ मार्च २०१८ रोजी ‘एसबीआय’मध्ये २ लाख ६३ हजार ५३८ कर्मचारी होते.