कोविडच्य कंत्राटी १८० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:06 AM2020-12-28T04:06:27+5:302020-12-28T04:06:27+5:30

नागपूर : स्वत:च्या जीवाची बाजी लावून कोरोनाबाधितांच्या सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी आरोग्य संघटनांकडून केली ...

More than 180 Kovid contract employees want permanent jobs! | कोविडच्य कंत्राटी १८० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी!

कोविडच्य कंत्राटी १८० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी!

Next

नागपूर : स्वत:च्या जीवाची बाजी लावून कोरोनाबाधितांच्या सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी आरोग्य संघटनांकडून केली जात आहे. मेडिकलमध्ये १२० तर मेयोमध्ये ९० कर्मचारी ही सेवा देत आहे. विशेष म्हणजे, आता बाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने या कर्मचाऱ्यांनाही कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाकाळात रुग्णसेवेसाठी तात्काळ कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली होती. सहा महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळत नाही, तोपर्यंत या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. परंतु आता रुग्णांमध्ये कमालीची घट दिसून येत आहे. यामुळे मेयो, मेडिकलमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये कामावरून कमी करण्याची भीती आहे.

-मेडिकलमध्ये ३५९, मेयोमध्ये १३५ पदे रिक्त

मेडिकलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ८२८ पदे मंजूर आहेत. यातील ३७५ पदे रिक्त आहेत. मेयोमध्ये ३२१ पदे मंजूर असताना १३५ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, रुग्णालयात दरवर्षी विभाग वाढत आहेत, खाटांची संख्या वाढत आहे, रुग्णसंख्या वाढत आहे. असे असताना रिक्त पदांमुळे रुग्णसेवेला फटका बसत आहे. यावर शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्याचे उपाय शोधले आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, अनुभव नसल्याने व नोकरी कायम राहण्याची शाश्वती नसल्याने त्यांच्याकडून विशेष काम होत नाही. यातही जेव्हा हे कर्मचारी रुग्णसेवेत रुळतात त्याचवेळी त्यांना नोकरीतून कमी केले जात असल्याने रुग्णसेवा अडचणीत येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

-मेयोमध्ये ८६ तर मेडिकलमध्ये १०० वर कंत्राटी परिचारिका

मेयो, मेडिकलमध्ये कोविड रुग्णांच्या सेवेसाठी कंत्राटी पद्धतीवर परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु आता रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने त्यांच्यावरही नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. सध्या मेयोमध्ये ८६ तर मेडिकलमध्ये १०० वर कंत्राटी परिचारिका कोविड रुग्णसेवेत आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या

::गुणवत्ता यादीनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात यावी. सेवेतून काढताना देखील त्याच आधारे निर्णय घेण्यात यावे.

:: कुठलीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करु नये. प्रशासनाने रुग्णसेवेतून कमी करताना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.

:: कोविड काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला जेवण व राहण्याची सोय केली होती. परंतु नंतर त्यांच्या या सुविधा बंद करण्यात आल्या. यामुळे बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले. या सुविधा कायम ठेवण्यात याव्या.

:: सेवेतून काढण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे. तसेच त्यांना नियमित वेतन द्यावे.

कुटुंबापासून दूर राहून कोरोना रुग्णांना आम्ही सेवा देत आहोत. आमच्या जीवाला कधीही धोका होण्याची शक्यता आहे. काही झाल्यास संपूर्ण कुटुंब उघड्यावर येईल. कंत्राटी कर्मचारी असल्याने नोकरीचीही शाश्वती नाही. कधी काढून टाकेल याचा नेम नाही. मागील सहा महिन्यातील कोविडचा मोठा अनुभव आहे. याचा फायदा रुग्णसेवेत होत आहे. शासनाने नोकरीत सामावून घ्यावे.

-संजय पाटील, कंत्राटी कर्मचारी

कोट...

मेयो, मेडिकलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. ती तातडीने भरण्यात यावी. शिवाय, रुग्णसंख्येच्या तुलनेत जेवढ्या कर्मचाऱ्यांची गरज आहे ती पदे या कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात यावी, अशी मागणी आहे.

-त्रिशरण सहारे

अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना (इंटक)

Web Title: More than 180 Kovid contract employees want permanent jobs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.