२० हून अधिक सुपारी व्यापाऱ्यांची होणार चौकशी; ईडीच्या धाडीनंतर अनेक जण धास्तावलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 08:59 PM2022-12-02T20:59:02+5:302022-12-02T20:59:52+5:30
Nagpur News गुरुवारी ईडीच्या पथकांनी केलेल्या छापेमारीनंतर नागपुरपासून आसामपर्यंतच्या सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नागपूर : गुरुवारी ईडीच्या पथकांनी केलेल्या छापेमारीनंतर नागपुरपासून आसामपर्यंतच्या सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तस्करीच्या रॅकेटमधील मोठा सूत्रधार असलेल्या जसबीर सिंह छटवाल उर्फ कॅप्टनच्या चौकशीत आसाम पोलीस व केंद्रीय एजन्सीजला इतरही लहान सुपारी व्यापाऱ्यांचा सुगावा लागला आहे. मध्य भारतातील अशा २० हून अधिक व्यापाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. याशिवाय कॅप्टनच्या संपर्कात असलेल्या इतर क्षेत्रातील व्यापारी व हवाला एजंट्सदेखील रडारवर आले आहेत.
ईडीने गुरुवारी इतवारी आणि पूर्व नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांचे कार्यालय, गोदाम, निवासस्थान आणि कोल्ड स्टोरेजसह १८ ठिकाणी छापे टाकले. यात मोठ्या प्रमाणात रोख व्यवसाय आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. नागपुरात प्रथमच सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीकडून इतकी मोठी कारवाई कण्यात आली. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली रोकड आणि कागदपत्रांची माहिती देण्यास ईडीचे अधिकारी टाळत आहेत. मस्कासाथच्या एका बड्या व्यावसायिकाच्या घरातून मोठे घबाड मिळाले होते. कॅप्टनसोबत गुवाहाटी पोलिसांनी सावन कुमार व अरुण त्यागी या दोन तस्करांनादेखील अटक केली होती. त्यांची नागपूर व मध्य भारताच्या तस्कर व्यापाऱ्यांशी संबंध असल्याच्या मुद्द्याची चाचपणी होत आहे.
अनेक व्यापारी ‘स्वीच ऑफ’
ईडी आणि गुवाहाटी पोलिसांच्या कारवाईनंतर अनेक सुपारी व्यापारी भूमिगत झाले आहेत. त्यांचे मोबाईल क्रमांकही 'स्वीच ऑफ' आहेत. ज्या व्यापाऱ्यांवर छापेमारी झाली नाही, त्यांचीही ईडीकडून चौकशी करत आहे. कॅप्टन सूर्य नगर येथील अनिल नावाच्या बॉक्स व्यापाऱ्याच्या मदतीने सुपारीची तस्करी करायचा. संबंधित डब्बा व्यापाऱ्याने सुपारी तस्करीतही मोठी गुंतवणूक केली आहे.
सुपारी बाजारात अफवांना ऊत
दरम्यान शुक्रवारीदेखील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये विविध अफवांना ऊत आला होता. छापेमारी करण्यात आलेले सुपारी व्यापारी हे बंदी असलेली इंडोनेशिअन सुपारीची तस्करी करायचे. मात्र नागपुरात साध्या सुपारीचेदेखील अनेक व्यापारी आहेत. ईडीची त्या व्यापाऱ्यांवरदेखील कारवाई होऊ शकते अशी अफवा पसरली होती. मात्र नेेमके तथ्य समोर आल्यावर साध्या सुपारीच्या व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.