नागपूर : शहरातील सर्व भागांत डासांचा त्रास वाढला आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून, मलेरियाचा धोका वाढला आहे; परंतु महापालिका प्रशासन गाढ झोपेत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला डासांचा त्रास वाढतो; परंतु यावर्षी पारा चढला असतानाही डासांचा त्रास वाढला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाही. औषधीची फवारणी बंद असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. नागरिक समस्या घेऊन मनपा कार्यालयात जातात. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. सध्या प्रशासकीय राजवट असल्याने माजी नगरसेवकांनी तक्रार केल्यानंतर त्याची अधिकारी व कर्मचारी दखल घेत नाहीत. यामुळे नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे.
मलेरिया-फायलेरिया विभाग नावासाठी
मनपाचा मलेरिया-फायलेरिया विभाग फक्त नावासाठी आहे. मलेरिया डासांमुळे होतो. यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी औषध फवारणी केली पाहिजे. मात्र, याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मलेरिया-फायलेरिया विभागाच्या अधिकारी दीपाली नासरे नागरिकांच्या फोनला प्रतिसाद देत नाहीत. समस्या जाणून घेत नसल्याने त्या सोडविणे तर दूरच आहे.
फॉगिंग केली जात आहे
मनपाच्या सर्व झोन क्षेत्रात मशीनद्वारे फॉगिंग केली जात आहे. जेथे फॉगिंग पाठविणे शक्य नाही त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांद्वारे औषधी फवारणी केली जात आहे.
राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा