मातृदिनी ‘ती’ परतली मायेच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 09:52 AM2019-05-13T09:52:03+5:302019-05-13T09:55:03+5:30
दैनंदिन जीवनात काही प्रसंग असे घडतात, की जे अनुभवताना डोळ्यांच्या कडा नक्कीच पाणावतात. असाच काहीसा प्रसंग मातृदिनी नागपुरातील दिघोरी परिसरात अनुभवायला आला.
मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दैनंदिन जीवनात काही प्रसंग असे घडतात, की जे अनुभवताना डोळ्यांच्या कडा नक्कीच पाणावतात. असाच काहीसा प्रसंग मातृदिनी नागपुरातील दिघोरी परिसरात अनुभवायला आला. आठ दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मातृछत्र मिळाले. आठ दिवसांपासून दूर असलेली आई अचानक भेटल्यानंतरचा तो प्रसंग बघून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
लक्ष्मी ठाकूर असे या चिमुकलीचे नाव आहे. दिघोरी परिसरात आजारी आईसोबत ती उघड्यावर राहत होती. याचा फायदा घेत एका महिलेने त्या चिमुकलीला आठ दिवसांपूर्वी पळवून नेले. या चिमुकलीला बैतुल पोलिसाच्या रेस्क्यु टीमने ताब्यात घेतले. ती नागपूरला राहत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे बैतुल पोलिसांनी नागपूर जिल्ह्याच्या महिला व बाल कल्याण समितीशी संपर्क साधला. शनिवारी बैतुल पोलीस तिला नागपुरात घेऊन आले. महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिला श्रद्धानंद अनाथालयात दाखल केले. ती मोठा ताजबाग परिसरात राहत असल्याचे सांगत होती. आज मातृदिनाला तिच्या आईची भेट घडवून देण्याचे जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात व जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी ठरविले. ते दोघे सकाळीच श्रद्धानंद अनाथालयात पोहचले. अनाथालयाचे काळजीवाहक सुभाष वाघमारे व रेखा वाघमारे यांना सोबत घेऊन मुलीसह ते मोठा ताजबाग परिसरात पोहचले.
ती ताजबाग परिसरात पोहचल्यानंतर तिने आईच्या ठिकाणाचा पत्ता लावला. तिची आई दिघोरी परिसरातील प्रगती सांस्कृतिक भवनाच्या मागील उद्यानातील झाडाच्या सावलीत बसली होती. त्या चिमुकलीला आई दिसताच तिने घट्ट मिठी मारत, तिच्या कुशीत जाऊन रडत सुटली. लक्ष्मीची आई सापडल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेसी यांना दिली. परदेसी यांनी त्या दोघींना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर, हुडकेश्वर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. हुडकेश्वर पोलिसांच्या मदतीने या दोघींना प्रियदर्शिनी वसतिगृहात दाखल करण्यात आले.
मन बेचैन होतं
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी शनिवारी मुलीला बैतुल पोलिसांच्या ताब्यातून श्रद्धानंद अनाथालयात दाखल केले. आज मातृदिन असल्याने तिला आई मिळावी, असे मनातून वाटत होते. त्यांनी समितीचे अध्यक्ष राजीव थोरात यांना संपर्क केला. त्यांनीही होकार दिल्याने, दोघांनीही आईचा शोध घेऊन, चिमुकलीला आई मिळवून दिली.
आई आहे दुर्धर आजाराने ग्रस्त
झाशीमध्ये राहणारी लक्ष्मीची आई अनिता ठाकूर ही दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. नवऱ्याने सोडल्यामुळे ती चिमुकलीसोबत नागपुरात भटकंती करीत आहे. दिघोरी परिसरातील एका उद्यानाच्या झाडाखाली तिचा निवारा आहे. महिला व बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात यांनी तिच्या आईची अवस्था बघितली. चिमुकल्या लक्ष्मीसोबत आईचेही पुनर्वसन करण्यासाठी त्यांना प्रियदर्शिनी वसतिगृहात पाठविण्यात आले.