बोईंग-७७७, ७८७ करिता एमआरओला मिळाले ईएएसए प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:50 PM2020-08-13T23:50:00+5:302020-08-13T23:50:02+5:30
नागपुरात एअर इंडियाच्या एमआरओला बोईंग-७७७ व ७८७ विमानांच्या इंजिनच्या टेस्टसाठी युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीचे (ईएएसए) प्रमाणपत्र मिळाले आहे.
वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात एअर इंडियाच्या एमआरओला बोईंग-७७७ व ७८७ विमानांच्या इंजिनच्या टेस्टसाठी युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीचे (ईएएसए) प्रमाणपत्र मिळाले आहे. लॉकडाऊन घोषणेच्या काही दिवसांपूर्वी या प्रमाणपत्रासाठी एमआरओचे आॅडिट झाले होते. त्यानंतर गुरुवारी एमआरओला एजन्सीचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
ईएएसए प्रमाणपत्रासाठी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (एआयईएलएल) गेल्या वर्षीच्या अखेरीस आवेदन केले होते. उल्लेखनीय असे की, या प्रमाणपत्रानंतर इंजिन टेस्टिंगसाठी कोणत्याही देशाचे बोईंग-७७७ व ७८७ विमान एमआरओमध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी येईल. परंतु आता एमआरओमध्ये इंजिन शॉपच्या इमारतीचे काम थांबले आहे. याशिवाय हँगरसाठी ईएएसएचे आॅडिट शेष आहे.
एमआरओला नागरी विमान महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मान्यतेसह फेडरल एव्हिएशन एजन्सीचे (एफएए) पूर्वीच प्रमाणपत्र मिळाले आहे. आता बोईंगच्या दोन प्रकारच्या विमानांच्या इंजिनसाठी तिसरे प्रमाणपत्रही मिळाले आहे. विमानाची देखभाल आणि दुरुस्तीच्या दृष्टीने हे प्रमाणपत्र नागपुरात एअर इंडिया एमआरओला महाद्वीपीय व्यवसाय वाढीस मदतनीस ठरणार आहे.