‘ईएएसए सर्टिफिकेट’साठी एमआरओचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:29 AM2018-08-21T00:29:03+5:302018-08-21T00:30:18+5:30
एअर इंडिया एमआरओतर्फे युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)चे सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी एमआरओने अर्ज केला आहे. ‘ईएएसए’च्या पथकातर्फे एमआरओचे आॅडिट केल्यानंतर हे सर्टिफिकेट मिळू शकणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअर इंडिया एमआरओतर्फे युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)चे सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी एमआरओने अर्ज केला आहे. ‘ईएएसए’च्या पथकातर्फे एमआरओचे आॅडिट केल्यानंतर हे सर्टिफिकेट मिळू शकणार आहे.
एअर इंडियाच्या एमआरओत तीन महिन्यानंतर युरोपीयन पथक आॅडिटसाठी येऊ शकते. यात फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आदी देशातील सदस्यांचा समावेश राहील. हे सर्टिफिकेट मिळविल्यानंतर नागपूरच्या ‘एमआरओ’ची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक पात्रता निर्माण होईल. त्यानंतर एमआरओमध्ये ज्यांच्याजवळ ‘ईएएसए’चे सर्टिफिकेट आहे त्या देशांची विमाने दुरुस्त केल्या जाऊ शकतील. बोईंगने या एमआरओसाठी गुंतवणूक केली होती. एमआरओत सर्व सोयी सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एमआरओला ‘ईएएसए’ सर्टिफिकेट मिळविण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नुकतीच येथे एका एटीआर विमानाची दुरुस्ती करण्यासाठी युरोपियन देश फ्रान्सच्या अभियंत्यांची चमू आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा मिळाल्यानंतर एमआरओला विमानांच्या देखभालीसाठी व दुरुस्तीसाठी एअरलाईन्सला वेटिंगमध्ये ठेवण्याची पाळी येणार आहे.