नागपूर : एमएससीमध्ये (पीजी) प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जागा वाढविण्याची मागणी रिपब्लिकन आघाडीने कुलगुरू यांच्याकडे केली आहे. नागपूर विभागात कोविड-१९ संक्रमण वाढल्याने सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे नागपूर विद्यापीठाने कॅप राऊंडमध्ये २० टक्के जागा वाढविल्या, पण आताही अनेक विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ सायन्समध्ये प्रवेश मिळाला नाही. खासगी महाविद्यालये प्रवेशासाठी जास्त फीची मागणी करीत आहेत. गरीब विद्यार्थ्यांना जास्त फी भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे यंदा वर्ष वाया जाण्याची भीती आहे. अशा स्थितीत रिपब्लिकन आघाडीने नागपूर विद्यापीठाकडे यावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. जागा वाढविल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आघाडीने दिला आहे. यावेळी संजय पाटील, दिनेश अंडरसहारे, डॉ. मनोज मेश्राम, सुनील जवादे, दादू अंबादे उपस्थित होते.
‘एमएससी’ प्रवेशासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:09 AM