नागपुरात व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशीच प्रेयसीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:27 PM2019-02-15T23:27:35+5:302019-02-15T23:30:08+5:30
सर्वत्र व्हॅलेन्टाईन डे चा फिवर चढला असताना दिघोरीतील एका प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून त्याच्या प्रेयसीची हत्या केली. एवढेच नव्हे तर तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावरील झुडूपात फेकून आरोपी पळून गेला. मात्र, सकाळी मृतदेह आढळताच गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्या प्रकरणाचा छडा लावून आरोपी रवींद्र गुलाबराव लांडगे (वय ३०, रा. वैभव नगर, दिघोरी) याच्या मुसक्या बांधल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वत्र व्हॅलेन्टाईन डे चा फिवर चढला असताना दिघोरीतील एका प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून त्याच्या प्रेयसीची हत्या केली. एवढेच नव्हे तर तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावरील झुडूपात फेकून आरोपी पळून गेला. मात्र, सकाळी मृतदेह आढळताच गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्या प्रकरणाचा छडा लावून आरोपी रवींद्र गुलाबराव लांडगे (वय ३०, रा. वैभव नगर, दिघोरी) याच्या मुसक्या बांधल्या.
मृत संगीता सोनकुसरे (वय ३०) पाचपावलीतील तांडापेठमध्ये राहत होती. हे दोघे ताजाबादमध्ये यायचे. तेथे ओळखी, मैत्री आणि नंतर त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी रवींद्रच्या वैभवनगरातील घरात हे दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. मात्र आठवडाभरातच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन रवींद्र संगीताला मारहाण करू लागला. गुरुवारी अशाच पद्धतीने त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. रवींद्रने संगीताला जोरदार मारहाण केली तर संगीतानेही त्याच्या कानशिलात लगावल्या. त्यामुळे त्याने संगीताचा धारदार शस्त्राने गळा कापला. पहाटेच्या वेळी संगीताचा मृतदेह त्याने घरापासून काही अंतरावर असलेल्या राऊतनगरातील संपदा कॉन्व्हेंटजवळच्या काटेरी झुडूपात फेकला आणि पळून गेला. शुक्रवारी सकाळी ९.४५ ला ही घटना उघडकीस आल्यानंतर तेजराम परसराम बोंभाटे (वय ६१) यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. माहिती कळताच नंदनवन पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करू लागले. संगीता आरोपी रवींद्र सोबत राहत होती, हे समजताच गुन्हे शाखा पोलिसांनी त्याचे घर गाठले. तेथे त्याच्या कपड्यावर आणि घरात रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याची चौकशी करताच त्याने हत्येची कबुली देऊन कारणही सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला नंदनवन पोलिसांच्या हवाली केले.