‘त्या’ व्यक्तीचा अकस्मात मृत्यू नसून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:09 AM2021-01-23T04:09:20+5:302021-01-23T04:09:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथळा शिवारात दाेन दिवसांपूर्वी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला हाेता. पाेलिसांनी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथळा शिवारात दाेन दिवसांपूर्वी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला हाेता. पाेलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला हाेता. त्या व्यक्तीच्या शरीरावर शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्याने त्याचा अकस्मात मृत्यू नसून खून करण्यात आल्याचे प्राथमिक उत्तरीय तपासणी अहवालात आढळून आले आहे, अशी माहिती कळमेश्वरचे ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली.
वसंतराव गाेविंदराव पुसदकर (५१, रा. सावंगी-शेतकी, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. ते अरुण सावरकर, रा. नागपूर यांच्याकडे महिन्याने कामाला हाेते. ते रविवारी (दि. १७) सकाळी ८ वाजताच्या सुमारास अरुण सावरकर यांच्या गुमथळा (ता. कळमेश्वर) शिवारातील शेतात कामाला गेले हाेते. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शाेध घेतला. कुठेही आढळून न आल्याने कळमेश्वर पाेलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नाेंदविली हाेती.
दरम्यान, बुधवार (दि. २०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह गुमथळा शिवारातील रस्त्यालगतच्या नालीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला हाेता. पाेलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला आणि अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपासाला सुरुवात केली. उत्तरीय तपासणीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, वसंतराव यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला नाही. त्यांच्या डाेके, हनुवटी व गळ्यावर शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे त्यांचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. त्यांचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात असून, पाेलिसांनी याला दुजाेरा दिला आहे. हा खून रायसिंग मेवाडा (४५) याने केल्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली असून, त्याच्या शाेधात कळमेश्वर पाेलिसांचे पथक मध्य प्रदेशात केले आहे. घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक तथा ठाणेदार आसिफराजा शेख करीत आहेत.