लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : विवादित जागेवर बांधकाम केल्यावरून वादाला ताेंड फुटले आणि त्यातून तरुणावर चाकूने वार करण्यात आले. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आराेपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील लाेहारीसावंगा येथे नुकतीच घडली.
शरद बाबाराव चापले (२६) असे मृताचे नाव असून, अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये गाैरव रत्नाकर सावरकर (१९), विक्की रत्नाकर सावरकर (२२), श्रावण किसन सावरकर (१९), रत्नाकर बाबूराव सावरकर (५२), दिनेश बाबूराव सावरकर (५०) यांच्यासह एका महिलेचा समावेश आहे. हे सर्व जण लाेहारीसावंगा, ता. नरखेड येथील रहिवासी आहेत. शरद व रत्नाकर यांची घरे लागूनलागून आहेत. तीन वर्षांपूर्वी रत्नाकरने शरदच्या घराची भिंत फाेडून काॅलमचे बांधकाम केले हाेते. त्यामुळे शरदने न्यायालयात दाद मागितली हाेती. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
दरम्यान, रविवारी (दि. १७) सकाळी शरदने रत्नाकरला त्याच्या घराची भिंत फाेडून बांधलेल्या काॅलमबाबत विचारणा केली. त्यामुळे रत्नाकरने शरदला धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शरद गुरांना पाणी पाजण्यासाठी शेतात गेला हाेता. ताे शेतात एकटा असल्याचे पाहून दिनेशने शरदला पकडून ठेवले आणि गाैरव, विक्की व श्रावणने त्याच्यावर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने शरदला नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी शरदची बहीण सविता बाबाराव चापले (३०) हिच्या तक्रारीवरून भादंवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा नाेंदवून सर्व आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक मंगेश काळे करीत आहेत.