नागपुरात खुनी हल्ला प्रकरणातील फरार आरोपीला देशी कट्ट्यासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 12:27 AM2020-04-04T00:27:09+5:302020-04-04T00:28:32+5:30
पाचपावली परिसरात खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीला तहसील पोलिसांनी मोमीनपुऱ्यातून अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली परिसरात खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीला तहसील पोलिसांनी मोमीनपुऱ्यातून अटक केली आहे. आरोपी मोमीनपुरा येथील रहिवासी समीर युनुस खान (२०) कुख्यात आरोपी आहे. पाचपावलीमध्ये ६ जानेवारीला त्याने एका युवकावर जीवघेणा हल्ला करून तो फरार झाला होता. पोलीस त्याचा तपास करीत होते. परंतु कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलीस कर्मचारी व्यस्त झाले. तहसील ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांनी डीबी स्कॉड टीमला मोमीनपुरा भागातीलअन्सारनगर व अन्य क्षेत्रात पेट्रोलिंग करण्याचे निर्देश दिले होते. गुरुवारी रात्री पोलीस अन्सारनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होती. तेव्हा समीर खान हा परिसरात फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला घेरले. त्याच्याकडून देशी कट्टा पोलिसांना मिळाला. त्याच्याजवळ कट्टा कुठून आला? कट्ट्याचा वापर त्याने कुठेकुठे केला? त्याचबरोबर तहसील क्षेत्रात १५ मार्च रोजी झालेल्या फायरिंगमध्ये त्याचा सहभाग होता काय, याची चौकशी पोलीस करीत आहेत. ही कारवाई दुय्यम पोलीस निरीक्षक दिलीप सागर, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील वाघ, संजय दुबे, अनिल चतुर्वेदी, पुरुषोत्तम जगनाडे, रणजित बावने, सचिन टापरे, अश्विन भामले यांनी केली.