मुस्लिम बांधवांनी देखील २२ जानेवारी रोजी रामनामाचा जयघोष करावा, मुस्लिम राष्ट्रीय मंचचे आवाहन
By योगेश पांडे | Published: January 9, 2024 12:08 AM2024-01-09T00:08:12+5:302024-01-09T00:08:31+5:30
देशासाठी तो ऐतिहासिक दिवस राहणार असून मुस्लिम बांधवांनीदेखील कमीत कमी ११ वेळा रामनामाचा जयघोष करून जगासमोर सामाजिक समरसतेचा मजबूत संदेश द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरात उत्साहाचे वातावरण असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फेदेखील मोठे आवाहन करण्यात आले आहे. देशासाठी तो ऐतिहासिक दिवस राहणार असून मुस्लिम बांधवांनीदेखील कमीत कमी ११ वेळा रामनामाचा जयघोष करून जगासमोर सामाजिक समरसतेचा मजबूत संदेश द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी २०२३ च्या अखेरीस नवी दिल्लीत याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर देशपातळीवर मंचच्या मुस्लिम कार्यकर्त्यांकडून नियोजन सुरू झाले. त्यानुसार देशातील बऱ्याच मशीदी, मदरसे यांच्यासह मुस्लिम धर्मगुरुंची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडल्या जात आहे. देशाला सामाजिक समरसतेचे उदाहरण जगासमोर मांडण्याची मोठी संधी आहे.
अनेक मुस्लिम बांधवांनी राममंदिराच्या निधी संग्रहातदेखील सहकार्य केले. मुस्लिम राष्ट्रीय मंचानेदेखील सुरुवातीपासूनच मंदिराची बाजू लावून धरली होती. अशा स्थितीत २२ जानेवारी घर, मशीद किंवा मदरसे येथे रामनामाचा जयघोष करण्याचे व जल्लोष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अयोध्येच्या जवळपासच्या भागातून राममंदिरापर्यंत मुस्लिम बांधवांनी पायी मार्च काढून पोहोचावे असेदेखील आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद देत काही मुस्लिम तरुणांनी पुढाकार घेत पायी मार्च सुरू केला आहे.
ही एक ऐतिहासिक संधी
याबाबत मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. जगासमोर भारतातील सामाजिक समरसता येणे आवश्यक आहे. ही एक ऐतिहासिक संधी आहे. मंचचे कार्यकर्ते जागोजागी जाऊन संपर्क करत आहेत व मौलवींना आवाहन करत आहेत. यात कुठलेही राजकारण नाही तर केवळ सामाजिक सद्भाव आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.