रामटेकवर डोळा ठेवूनच माझे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:46+5:302021-07-27T04:09:46+5:30
नागपूर : सच्चा काँग्रेसी असल्याने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्ष नेतृत्वाने रामटेकमध्ये विधानसभा लढण्याची संधी दिली. तेव्हापासून पक्षातील काही ज्येष्ठ ...
नागपूर : सच्चा काँग्रेसी असल्याने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्ष नेतृत्वाने रामटेकमध्ये विधानसभा लढण्याची संधी दिली. तेव्हापासून पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना पोटदुखीचा त्रास वाढला आहे. भविष्यात रामटेक मतदारसंघावर डोळा ठेवूनच जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे यांच्या मारहाणीचे प्रकरण वाढविण्यात आले. मला या प्रकरणात गोवण्यासाठी पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करीत काँग्रेसचे निलंबित जिल्हा महासचिव गज्जू यादव यांनी सोमवारी नाव न घेता जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यावर बॉम्ब टाकला.
दुधाराम सव्वालाखे यांना माझ्या भावाने मारले हे मान्य करतोच. यासाठी मी त्यांची माफीही मागितली. ही घटना झाली तेव्हा पारशिवनीत १५० कार्यकर्ते होते. मात्र, कुणीही या घटनेचा व्हिडिओ बनविला नाही. मुळात या प्रकरणात मला आणि माझ्या सहकाऱ्यांना गोवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. सव्वालाखे यांना गंभीर जखम झाल्याचा रिपोर्ट देण्यासाठी मेडिकलच्या अधिष्ठात्यावर दबाव टाकण्यात आला. पक्षाने मला निलंबित केले. हे मला मान्य आहे. मात्र निलंबन करण्यापूर्वी कोणतीही नोटीस बजाविण्यात आली नाही. माझी बाजू पूर्णपणे ऐकून घेण्यात आली नाही. त्यामुळे यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रभारी एच. के. पाटील, मुकुल वासनिक यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे यादव यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे आयोजित या पत्रपरिषदेला रामटेक तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, निवडक सरपंच, पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दुसऱ्या फळीच्या नेत्यांना संधी कधी?
पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी गतवर्षी मार्च महिन्यात राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. तेव्हा दुसऱ्या फळीत काम करणाऱ्या आम्ही काही कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी सत्तापक्ष नेते बाबा आष्टणकर यांचे नाव पुढे केले होते. आष्टणकर यांना संधी देण्यात यावी अशी पक्षातील जेष्ठ नेत्यांकडे मागणी केली होती. मुळक यांना रामटेकमध्ये लढायचे असेल अवश्य लढावे. आम्ही त्यांच्यासाठी काम करू. ते आजीवन जिल्हाध्यक्ष राहिले तरी त्यांना माझा विरोध नसण्याचे कारण नसल्याचे यादव यांनी एकाप्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
तो एक योगायोगच
यादव यांच्या निलंबन पत्रावर पक्षाचे दिवंगत प्रदेश उपाध्यक्ष माणिक जगताप यांची स्वाक्षरी आहे. हे पत्र २४ जुलै रोजीचे आहे. २५ जुलै रोजी जगताप यांचे मुंबई येथे निधन झाले. जगताप आजारी असल्याने त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. यादव यांचे निलंबन आणि जगताप यांचे निधन हाही एक योगायोगच म्हणावा लागेल.