ना फ़नकार तुझसा तेरे बाद आया, मोहम्मद रफ़ी तू बहुत याद आया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:56+5:302021-07-31T04:08:56+5:30

- आज ४१ वा स्मृतिदिन : १९६२ आणि १९७१ मध्ये नागपूरकरांशी झाला होता दिदार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

Na fankar tujhsa tere baad aaya, mohammad rafi tu bahut yaad aaya | ना फ़नकार तुझसा तेरे बाद आया, मोहम्मद रफ़ी तू बहुत याद आया

ना फ़नकार तुझसा तेरे बाद आया, मोहम्मद रफ़ी तू बहुत याद आया

Next

- आज ४१ वा स्मृतिदिन : १९६२ आणि १९७१ मध्ये नागपूरकरांशी झाला होता दिदार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मो. रफी हे केवळ नाव नव्हे तर बॉलिवूड गीतांचे एक युग आहे आणि त्यांच्या स्वरांची छटा आजही रसिकांच्या हृदयात घट्ट आहेत. मो. रफी यांच्या स्वरांचा चाहता वर्ग अफाट आहे. त्यांची गाणी जसे जुन्या पिढीतील लोक आनंदविभोर होऊन गुणगुणतात, ऐकतात तसेच नव्या पिढीतील रसिक व गायकही गुणगुणण्यापासून दूर राहू शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर तर आनंद बक्षी यांनी लिहिलेले व मोहम्मद अजीज यांनी गायलेले ‘ना फ़नकार तुझसा तेरे बाद आया, मोहम्मद रफ़ी तू बहुत याद आया’ हे गीत संयुक्तिक आणि तितकेच वास्तववादीही वाटते. शनिवारी, ३१ जुलै रोजी त्यांचा ४१ वा स्मृतिदिन. यानिमित्ताने नागपूरकरांनी मो. रफी यांचा दोन वेळा थेट दिदार घेतल्याच्या स्मृती जाग्या होत आहेत. मो. रफी यांचे नागपूरला बरेचदा येणे झाले. मात्र, थेट कार्यक्रम केवळ दोन वेळाच झाले. एक १९६२ साली आणि दुसरा १९७१ साली. यावेळी केवळ त्यांच्या उपस्थितीनेच नागपूरकर आनंदित झाले होते आणि ते कधी गातात, याचेच वेध त्यांना लागले होते.

रफींसमोर त्यांचीच गाणी गाण्याचे भाग्य

१९७१ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने फंड रेझिंगकरिता सिव्हिल लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या बिलिमोरिया पव्हेलियनमध्ये फिल्म स्टार नाइटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहम्मद रफी यांच्यासोबत मन्ना डे, सुमन कल्याणपूर, राजेंद्रकुमार, धर्मेंद्र, आशा पारेख, हेलन, शशी कपूर, विनोदी अभिनेता जॉनी व्हिस्की उपस्थित होते. या कार्यक्रमात स्थानिक गायक म्हणून अर्धा तास गाण्याची मला व माझी पत्नी झिनत कादर हिला संधी प्राप्त झाली. रफी हे माझे आदर्श आणि मी त्यांचीच गाणी सादर केली. त्यानंतर रफी साहेबांनी कौतुकाची थापही दिली होती. त्यानंतर जोवर ते नागपुरात होते, तोवर मी त्यांची साथ सोडली नाही. त्यांना ताजाबादचे दर्शनही घडवून दिले होते. वेळेअभावी वाकी शरीफचे दर्शन घडविता आले नाही.

- एम. ए. कादर, प्रसिद्ध पार्श्वगायक

उर्दूत गीत लिहून देण्याचा प्रचंड आनंद

संगीतकार राम-लक्ष्मण अर्थात विजय पाटील यांनी मला मुंबईला बोलावले होते. त्यावेळी ‘देवा हो देवा गणपती देवा’ या गाण्याची रेकॉर्डिंग सुरू होती. विजय पाटील यांनी उर्दूमध्ये गीत लिहून दिले तर रफी साहेबांना प्रचंड आनंद होतो, असे म्हणून मला या गाण्याच्या ओळी उर्दूमध्ये लिहून देण्यास सांगितले. मी तो कागद पुढे केल्यावर रफी साहेब प्रचंड आनंदले असल्याची आठवणही कादर यांनी सांगितली.

कोकाकोला आणि घसा

रफी साहेबांना कोकाकोला खूप आवडत असे. त्यामुळे मी कोल्ड्रिंक घेऊनच घरी आलो. मात्र, गायकाने कोल्ड्रिंक घेऊ नये, असे म्हणतात, हे मी त्यांना सांगितले. तर ज्याचा गळा आधीच खराब, तो काय कोल्ड्रिंकने खराब होणार, अशी मस्करी त्यांनी केल्याची आठवण किशन शर्मा यांनी सांगितली.

सिव्हिल लाइन्स येथे मो. रफी चौक

महान गायकाच्या नावे नागपुरात काहीच नाही म्हणून सिव्हिल लाइन्स येथे मो. रफी चौक स्थापन करण्याचा प्रस्ताव मो. सलिम शेख यांनी दिला होता. २०११ साली तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते या चौकाचे लोकार्पण झाले.

एकमेव सभागृह नागपुरात

मो. रफी यांच्या नावाचे चौक, रोड आदी अनेक ठिकाणी आहेत. मात्र, सभागृह एकही नाही. नागपुरात एम. ए. कादर यांनी सेंट्रल एव्हेन्यू रोडवर मो. रफी कल्चरल हॉल उभारला. हे देशात एकमेव सभागृह त्यांच्या नावे आहे.

-----------------

रफी माझ्या दारात आणि मी आकाशवाणीत

१९६० मध्ये मो. रफी रायपूरच्या कार्यक्रमासाठी नागपूरला आले असताना परतीचे विमान दिवशी रद्द झाले. पुढची फ्लाइट दुसऱ्या दिवशी संध्याकाळची होती. त्यामुळे ते मेयो इस्पितळापुढे असलेल्या स्कायलार्क हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. चाहत्यांना हे कळताच हॉटेलपुढे प्रचंड गर्दी उसळली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी माझा पत्ता काढला आणि गुपचूप हॉटेलमधून निघून माझ्या शिवाजीनगर येथील घरी पोहोचले. दारात एवढा मोठ्ठा गायक पाहून माझी पत्नी शॉक झाली. तेव्हा मी आकाशवाणीत नोकरी करत होतो. त्यांनी माझ्या पत्नीला तुमच्या घरी थोडी विश्रांती घ्यायची असल्याची विनवणी केली. माझ्या पत्नीने त्यांची व्यवस्था केली आणि मला तत्काळ फोन केला आणि मी लगेच घरी आलो. या महान गायकासोबत दीर्घकाळ सहवास लाभला, याचा आनंद झाला.

- किशन शर्मा, ज्येष्ठ उद्घोषक, आकाशवाणी (निवृत्त) .......

Web Title: Na fankar tujhsa tere baad aaya, mohammad rafi tu bahut yaad aaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.