दीक्षाभूमीवर नमो बुद्धाय, जयभीमचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 09:48 PM2019-10-14T21:48:57+5:302019-10-14T21:49:51+5:30
नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तथागतांचे धम्मचक्र गतिमान केले. या ऐतिहासिक क्रांतीला भारताच्या इतिहासात वेगळेच महत्त्व आहे. या दिनाच्या निमित्ताने सोमवारी केवळ नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती.
‘६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना’च्यानिमित्ताने सकाळी ७ वाजता दीक्षाभूमीवर विविध संघटनांच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. शुभ्र वस्त्र परिधान केलल्या जत्थ्याजत्थ्याने येणाऱ्या अनुयायांनी दीक्षाभूमी फुलून गेली होती. दीक्षाभूमी येथील स्तुपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांची रांग लागली होती. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देत जयघोष केला जात होता. सायंकाळी अनुयायांची गर्दी वाढली होती. अनेक जण आपल्या कुटुंबासह जेवण्याच्या डब्यासह आले होते. ‘जयभीम’ या एकाच उच्चाराने अनोळखी कुटुंबही आपला डबा ‘शेअर’ करताना दिसून येत होते. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी होती. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्यावतीने पिण्याचे पाणी व इतरही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. फूटपथावर पुस्तकांचे व तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेबांच्या मूर्ती, फोटोंचे स्टॉल्स लागले होते. विशेष म्हणजे, यावर्षी केवळ नागपुरातूनच नव्हे तर तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कोल्हापूर आदी ठिकाणांहूनही अनुयायी आले होते.
वस्त्यावस्त्यांमधून निघाली रॅली
नागपूरच्या विविध वस्त्यांमध्ये ‘भीम रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. दुपारी निघालेली रॅली सायंकाळी दीक्षाभूमीवर पोहचताच एकच जल्लोष होत होता. पांढऱ्या वस्त्रातील अनुयायी ‘जयभीम’च्या जयघोषात एकमेकांना शुभेच्छा देत होते. जयभीमनगर, इंदोरा, टाकळी सीम, नारा, बेझनबाग, अंबाझरी, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, चंदननगर, जाटतरोडी, चंद्रमणीनगर, नवीन बाभूळखेडा, मानेवाडा, दिघोरी यासारख्या कितीतरी वस्त्यांमधून रॅली निघाल्या.
संविधान चौकात आकर्षक रोषणाई
संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. येथेही सकाळपासून अनुयायांनी गर्दी करून बाबासाहेबांना मानवंदना दिली. सायंकाळी या ठिकाणी काही संघटनांनी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.