बाजार समितीतून हरभऱ्याचे चक्क ३०० कट्टे गायब; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 12:43 PM2022-05-23T12:43:35+5:302022-05-23T12:53:54+5:30
बाजार समितीच्या आवारातून हरभऱ्याचे ३०० कट्टे गायब झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. शिवाय, भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शरद मिरे
भिवापूर (नागपूर) : बाजार समितीच्या यार्डात नाफेडची परवानगी नसताना जगाचा पाेशिंदा या फार्मर प्राेड्युसर कंपनीने नाफेडच्या नावावर हरभऱ्याची खरेदी केली. प्रकरण उघड हाेताच ते दडपण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातच बाजार समितीच्या आवारातून हरभऱ्याचे ३०० कट्टे गायब झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. शिवाय, भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही फार्मर प्राेड्युसर कंपनी भंडारा जिल्ह्यातील असून, कंपनीचे संचालक त्र्यंबक गिरीपुंजे, रा. माेखारा, जिल्हा भंडारा यांनी भिवापूर येथील एका व्यापाऱ्याच्या परवान्यावर स्थानिक अडतीयाकडून ५०० क्विंटल हरभरा खरेदी केला होता. त्यातील ४०० क्विंटल हरभऱ्याचे प्रत्येकी ५० किलोप्रमाणे ८०० पाेती (कट्टे) तयार करून त्यावर नाफेडचा स्टॅम्प मारला हाेता. यातील ४०० कट्टे एमएच-३४/एम-६४४५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरले हाेते. उर्वरित ४०० कट्टे एमएच-३३/बीजी-८०६४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरणे सुरू असताना प्रकरण उघड झाले. त्यामुळे ते ४०० कट्टे बाजार समितीच्या आवारातील ओट्यावर पडून होते. या कट्ट्यांची शनिवारी (दि. २१) पाहणी केली असता, यातील २५० कट्टे गायब आढळून आले. तेथील ताडपत्री खाली केवळ ५० कट्टे हाेते. दरम्यान, रविवारी (दि. २२) सकाळी या कट्ट्यांची पाहणी केली असता, ते ५० कट्टेही गायब असल्याचे दिसून आले.
बारदाण्याची अदलाबदल
या प्रकरणात हरभरा भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या बारदानाची अदलाबदल करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. हा प्रकार बाजार समितीच्या आवारात घडल्याने यात बाजार समिती प्रशासन लिप्त असल्याचा संंशय व्यक्त केला जात आहे. हरभरा खरेदीसाठी त्र्यंबक गिरीपुंजे भिवापूर येथील काही व्यापाऱ्यांच्या संपर्कात हाेते. या कामासाठी काही अडतीयांनी त्यांना नकार दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात लिप्त असलेली मंडळी आता नाफेडला बारदान पुरवणाऱ्या एजन्सीचा शाेध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.