नागपुरात विनयभंग करणाऱ्याला जमावाने रस्त्यावरच बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:59 PM2018-05-31T21:59:11+5:302018-05-31T21:59:21+5:30
भरदुपारी रस्त्यावर तरुणीची छेड काढू पाहणाऱ्या मजनूला संतप्त जमावाने बदडून काढले. वेळीच पोलीस पोहचले म्हणून त्याचा जीव वाचला. जमावाच्या हातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरदुपारी रस्त्यावर तरुणीची छेड काढू पाहणाऱ्या मजनूला संतप्त जमावाने बदडून काढले. वेळीच पोलीस पोहचले म्हणून त्याचा जीव वाचला. जमावाच्या हातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अजय जयसिंग सिखरवार (वय २३) असे मजनूगिरी करणाऱ्याचे नाव आहे. तो पांढराबोेडीतील रहिवासी आहे.
पीडित तरुणी २० वर्षांची आहे. ती बुधवारी दुपारी ३.२० वाजता लाहोरी बार समोरच्या आॅप्टीकल दुकानासमोरून जात असताना आरोपी अजय सिखरवार हा तिच्या मागे गेला अन् भररस्त्यावर तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तरुणीने त्याचा विरोध करून आरडाओरड केली. वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. तरुणीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे संतप्त जमावाने आरोपी सिखरवारला बदडून काढले. एकाने नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविला. त्यावेळी सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आपल्या सहकाऱ्यांसह याच भागात गस्त घालत होते. त्यामुळे काही वेळेतच ते तेथे पोहचले. आरोपीला जमाव बदडत होता. त्यांनी जमावाची कशीबशी समजूत काढून त्यांच्या तावडीतून आरोपी सिखरवारला ताब्यात घेतले. जमावाने आरोपीला बुकलल्याने तो जबर जखमी झाला होता. तो दारूच्या नशेत टून्न होता. त्याच्यावर उपचार करून घेतल्यानंतर पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेत आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.