सुरभी शिरपूरकर
नागपूर : विदर्भाचे आराध्य दैवत असलेले नागद्वार स्वामी यांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. अमरनाथ यात्रे प्रमाणेच अतिशय कठीण मानली जाणारी नागद्वार यात्रेचे द्वार दोन वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा भाविकांसाठी उघडण्यात आले आहे.
कैलाश पर्वत नंतर पचमढीला महादेवाचे दुसरे घर मानलं जातं. सातपुडाची राणी मानल्या जाणाऱ्या पचमढीत एक असे देवस्थान आहे ज्याला नागलोकचा मार्ग किंवा नागद्वारच्या नावाने ओळखल्या जाते. एका बाजूला खडतर डोंगररस्ता तर बाजुला मोठी दरी, यामध्ये छोटासा रस्ता.. तो पार करत भाविक मोठ्या उत्साहाने नागदेवाचं दर्शन घ्यायला जातात. यावेळी हरिहर.. हरिहरच्या गजरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो.
संत गोविंदराव शिरपूरकर यांच्या नावे सातपुडा पर्वत रांगेत गोविंद गिरी पहाड आहे. गोविंद गिरी पहाडावर मुख्य गुहेत शिवलिंग असून या शिवलिंगाला काजळ लावल्यास मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. गोविंदराव शिरपूरकर यांनी अनेक वर्ष येथे पूजा अर्चना केली. भाविकांना भोजनाची व्यवस्था केली. तर त्यांची ही परंपरा गोविंदरावंचे वंशज आणि ज्येष्ठ समाजसेवक यादवराव शिरपूरकर त्यांचे सहकारी व इतर काही मंडळ चालवीत आहेत. लाखो भाविकांसाठी भंडारा व इतर व्यवस्थेची परंपरा ते चालवतात.
तर छिंदवाडा आणि पिपरिया मध्ये वसलेली आदिवासी कोरकू समाजाची मंडळी या यात्रेत विशेष भूमिका पार पाडतात. हा समुदाय लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंतचया लोकांना आपल्या खांद्यावर बसवून पहाड चढतात. या अतिशय कठीण यात्रेत खिशात एक मोबाईल ठेवून सुद्धा ओझं वाटतं पण या यात्रेत ही कोरकू मंडळी आपल्या डोक्यावर गॅस सिलेंडरपासून ते जनरेटर व इतर अनेक भंडाऱ्याचे सामान ठेवून पहाड चढतात.
नागमोडी वळणातून नागद्वारची कठीण यात्रा पूर्ण केल्यास कालसर्प दोष दूर होतो अशी ही भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळे श्रावणात रिमझिम पावसाचे यात्रेला भाविक मोठ्या संख्येत भक्तीभावाने सहभागी होतात.
सातपुडा पर्वत रांगेत सात पहडांना पार करून तुम्ही नागद्वारी पोहोचू शकता. अगदी पहाटेच भाविक नागदेवतेच्या दर्शनासाठी निघतात. नागद्वार मंदिराची गुफा जवळजवळ ३५ फिट लांब आहे. याशिवाय या यात्रेत विशेष करून कालाझाड (भाजीयागिरी) ते काजळी, पदमशेष प्रथम द्वार, पश्चिम द्वार (द्वितीय द्वार) चिंतामणी, चित्रशाळा माई, गुप्त गंगा, निशाण गढ, जलगली, गुप्तगंगा इत्यादी देवस्थानाचे दर्शन आणि जवळजवळ २५ ते ३० किलोमीटरची पैदल पहाडी यात्रा पूर्ण करायला जवळजवळ दोन ते ३ दिवसाचा कालावधी लागतो. अशी मान्यता आहे की अनके वर्षांपूर्वी यात्रेच्या वेळी पहाडाच्या संपूर्ण मार्गावर नागदेवतेचे दर्शन व्हायचे आणि भाविक यांना हाताने सरकवत पुढची वाटचाल पूर्ण करायचे.
कढई आणि कसानीची प्रथा
नागद्वार यात्रेनंतर कढई किंवा कसनी करणे ही आवश्यक असते आणि मनंतप्रमाणे भाविक ही परंपरा ही गेल्या शेकडो वर्षांपासून निभवतायत.
सातपुडा हा फॉरेस्ट रिझर्व एरिया असल्याने नागद्वार स्वामीच्या दर्शनासाठी भाविकांना वर्षभर वाट पहावी लागते. गेली दोन वर्ष कोविडच्या संसर्गामुळे यात्रा बंद होती. परंतु, यावर्षी यात्रेला परवानगी मिळाली असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाविकांचे खास आकर्षण असलेली नागद्वार पचमढी यात्रेसाठी एसटीची विशेष बस सेवा ही सुरू झाली आहे.
यंदा नागद्वार यात्रा दहा दिवसांची असेल. तर पाच लाखाहून अधिक श्रद्धाळू दर्शनाला येतील असा अंदाज आहे. २३ जुलैपासून ते ३ ऑगस्ट पर्यंत यात्रेची अनुमती प्रशासनाने दिलेली आहे. तर नागपूरकरांनो.. हर भोला हर हर महादेवचा गजर करत तयार आहात ना नागद्वार यात्रेला..