नागपुरात ५४ गुन्हे करणारा कुख्यात चेनस्नॅचर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:58 AM2019-07-17T00:58:31+5:302019-07-17T00:59:12+5:30
वयाच्या १७ व्या वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय झालेला आणि ५४ गुन्हे दाखल असलेला कुख्यात सोनसाखळी चोरटा (चेनस्नॅचर) स्वरूप नरेश लोखंडे (वय २६) याच्या मुसक्या बांधण्यात अजनी पोलिसांनी यश मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वयाच्या १७ व्या वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय झालेला आणि ५४ गुन्हे दाखल असलेला कुख्यात सोनसाखळी चोरटा (चेनस्नॅचर) स्वरूप नरेश लोखंडे (वय २६) याच्या मुसक्या बांधण्यात अजनी पोलिसांनी यश मिळविले. चोरलेल्या सोन्याची विल्हेवाट लावण्यास लोखंडेला मदत करणारा सराफा व्यापारी भारत ऊर्फ बंटी उदयभान गलबले यालाही पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून ७६ ग्रॅम सोने, दोन दुचाकी तसेच चोरीच्या दागिन्यांना विकून त्यातून घेतलेल्या एलसीडी, फ्रीजसह पावणेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त रमेश घार्गे आणि अजनीचे ठाणेदार हनुमंत उरलागोंडावार हजर होते.
स्वरूप लोखंडे नरेंद्रनगर पुलाजवळ राहतो. तो अत्यंत धूर्त आहे. वयाच्या १७ व्या वर्षीच स्वरूप लोखंडे गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्याच्याविरुद्ध हत्या, बलात्कार, अपहरण, लुटमार, विनयभंग असे एकूण ५४ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. चालत्या दुचाकीवरील महिला-पुरुषांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्यात तो सराईत आहे. चोरलेले दागिने विकण्यासाठी त्याने बंटी गलबले नामक सराफा व्यापाऱ्याला हाताशी ठेवले होते. उपराजधानीत सर्वत्र नाकाबंदी असतानाही तो गल्लीबोळात जाऊन चेनस्नॅचिंग करतो. त्यासाठी तो आधी हिरो होंडा आणि आता पल्सरचा वापर करायचा. हेल्मेट घालून चेनस्नॅचिंग केल्यानंतर तो दुचाकी बदलवायचा आणि रस्त्यावर राजरोसपणे फिरायचा. हेल्मेटमुळे चेहरा ओळखला जात नसल्याने त्याला पकडले जाण्याची अजिबात भीती वाटत नव्हती.
जून आणि जुलै या अवघ्या दीड महिन्यात त्याने ११ सोनसाखळी चोरीचे आणि दोन वाहन चोरीचे गुन्हे केले. चोरीच्या दागिन्याची विक्री करून तरुणींवर तो पैसे उधळतो. काही दिवसांपूर्वी त्याने अशाच प्रकारे चेनस्नॅचिंग केली आणि एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले. मुलीच्या पालकांनी नोंदविलेल्या तक्रारीची दखल घेत अजनी पोलिसांनी स्वरूपची शोधाशोध केली. मैत्रिणीच्या माध्यमातून पोलिसांनी स्वरूपसोबत असलेल्या मुलीचे समुपदेशन केले. त्यामुळे काही दिवसांत ती घरी परतली. तिच्याकडून मिळालेल्या
माहितीनुसार तो वाडी (धाबा) परिसरात एका भाड्याच्या घरात राहत असल्याचे अजनी पोलिसांना कळले.
त्यावरून पोलिसांनी १४ जुलैला स्वरूपच्या मुसक्या बांधल्या.
४५ दिवसांत १३ गुन्हे
उपराजधानीतील विविध भागात चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. चेनस्नॅचरचा छडा लावण्यासाठी विविध ठाण्यातील पोलीस, गुन्हे शाखेची पथके धावपळ करीत होती. मात्र, त्यांना चेनस्नॅचरला अटक करण्यात यश मिळत नव्हते. अजनीचे ठाणेदार हनुमंत उरलागोंडावार, पोलीस उपनिरीक्षक संजय चप्पे, कैलास मगर, सुचिता मंडवाले, हवालदार प्रवीण नखाते, शैलेष बडोदेकर, सिद्धार्थ पाटील, नायक भगवती ठाकूर, शिपाई आशिष राऊत, हंसराज पाऊलझगडे आणि दीपक तºहेकर यांनी कुख्यात चेनस्नॅचर लोखंडेच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी बजावली. त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा रिवॉर्ड देणार असल्याची माहितीही यावेळी उपायुक्त रौशन यांनी दिली. दीड महिन्यात ११ चेनस्नॅचिंग आणि दोन वाहन चोरीचे असे एकूण १३ गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ७६ ग्रॅम सोने, एक हिरो होंडा, एक पल्सर, एलसीडी, फ्रीज, कूलर, तीन मोबाईल असा एकूण ३ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तो एवढा सराईत आणि निर्ढावलेला आहे की गुन्हा करताना एकटाच राहतो. त्याने महिलाच नव्हे तर पुरुषांच्या गळ्यातील सोनसाखळ्याही लंपास केल्याचे कबूल केल्याची माहिती उपायुक्त रौशन यांनी पत्रकारांना दिली.
मकोका लावणार!
कुख्यात स्वरूप लोखंडे याला हुडकेश्वर पोलिसांनी २०१३ मध्ये अटक केली होती. त्यावेळी लोखंडेने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चक्क पोलीस कोठडीतून पळ काढला होता. तो आपली ओळख लपवून अटक टाळण्यासाठी कधी रामेश्वरी, कधी सोमलवाडा तर कधी वाडीत भाड्याची खोली घेऊन राहत होता. पळवून नेलेल्या मुलीला आपली पत्नी आहे, असे सांगून त्याने वाडीत भाड्याची खोली घेतली होती. लोखंडे आणत असलेले दागिने चोरीचे आहे, हे माहीत असूनही त्याच्याकडून सराफा व्यापारी गलबले विकत घेत होता. गलबले हे दागिने कुणाला विकत होता, त्याची चौकशी सुरू आहे. त्याने सराफा दुकान बंद केले. सध्या तो मोबाईल शॉपी चालवितो. स्वरूपकडून दागिने घेऊन ते दुसरीकडे विकण्याचा जोडधंदा गलबले करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्वरूप आणि साथीदाराच्या गुन्हेगारीचा अहवाल बघता, त्याच्यावर मकोका लावण्याचा विचार सुरू असल्याचेही पोलीस उपायुक्त रौशन यांनी पत्रकारांना सांगितले.