नागपुर @ ५.७ डिग्री : थंडीची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 09:41 PM2018-12-28T21:41:04+5:302018-12-28T21:43:09+5:30
नागपुरात थंडीची लाट पसरली आहे. केवळ २४ तासात किमान तापमान ५.२ डिग्रीने खाली आले असून ते ५.७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. सामान्यपेक्षा ७ डिग्री पारा खाली उतरल्यामुळे शहर अति थंडीच्या लाटेत सापडले आहे. यासोबतच नागपूर पूर्ण विदर्भात सर्वात थंड राहिले. शुक्रवारी या मोसमातील सर्वात थंड दिवसाची नोंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात थंडीची लाट पसरली आहे. केवळ २४ तासात किमान तापमान ५.२ डिग्रीने खाली आले असून ते ५.७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. सामान्यपेक्षा ७ डिग्री पारा खाली उतरल्यामुळे शहर अति थंडीच्या लाटेत सापडले आहे. यासोबतच नागपूर पूर्ण विदर्भात सर्वात थंड राहिले. शुक्रवारी या मोसमातील सर्वात थंड दिवसाची नोंद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सात दिवसांपूर्वीच नागपूरचे किमान तापमान ६.३ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. यानंतर हळूहळू पारा वाढत जाऊन गुरुवारी तो १०.९ डिग्रीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे थंडीपासून थोडा दिलासा मिळाला होता. परंतु उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेच्या वाऱ्यामुळे वातावरण अचानक बदलले. चार वर्षांपूर्वी २९ डिसेंबर २०१४ रोजी शहरातील किमान तापमान ५ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. ते आजवरचे सर्वात कमी तापमान राहिले आहे. अशावेळी शुक्रवारी नोंदवण्यात आलेले तापमान आतापर्यंतच्या सर्वाधिक थंड दिवसापेक्षा केवळ ०.७ डिग्री सेल्सिअस अधिक होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात थंड हवेचा जोर राहणार असल्याने शहरात थंडीची लाट कायम राहील. त्याचप्रकारे विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही थंड हवेचा जोर कायम राहील.
नागपूरनंतर ८.५ डिग्री सेल्सिअससह अकोला, बुलडाणा, गोंदिया संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. वाशिम ९ डिग्री, यवतमाळ, ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्ये १० डिग्री, वर्धा १०.५ डिग्री, अमरावतीमध्ये १०.६ डिग्री आणि गडचिरोलीमध्ये ११.२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
२८ डिसेंबरचा असाही योगायोग
२८ डिसेंबर १९८३ रोजी नागपुरातील किमान तापमान ५.७ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. योगायोगाने शुक्रवारी २८ डिसेंबर २०१८ रोजी किमान तापमान ५.७ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. आगामी काही दिवसात अशीच कडाक्याची थंडी राहण्याचा अंदाज आहे.
सर्वात कमी तापमान
---------------------------
दिनांक तापमान
----------------------------
२९ डिसेंबर २०१४ ५.०
२९ डिसेंबर १९६८ ५.५
२८ डिसेंबर १९८३ ५.७
२२ डिसेंबर २०१८ ६.३
२८ डिसेंबर २०१८ ५.७
------------------------------