रात तक पाच करोड दे, वरना... नागपुरातील बिल्डरला खंडणीसाठी धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 01:29 PM2022-02-15T13:29:22+5:302022-02-15T14:04:37+5:30
गाडगे यांच्या तक्रारीनुसार, गेल्या सात दिवसांपासून आरोपी त्यांना फोन करतो. फोनमध्ये त्याने गोपाल कोंडावर प्रकरणाचा उल्लेख करून त्यात यापुढे हिशेबाने राहा, अन्यथा तुला उचलून घेईन, अशी धमकी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिल्डर प्रफुल्ल गाडगे यांना एका गुंडाने पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली. खंडणी दिली नाही तुझे अपहरण करेन, अशीही धमकी दिली. हे वृत्त चर्चेला येताच नागपूर शहरातील बिल्डर-डेव्हलपर्स लॉबीत एकच खळबळ निर्माण झाली. दरम्यान, गाडगे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून या प्रकाराची तक्रार दिल्यानंतर धमकी देणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
साैरभ द्विवेदी असे त्याचे नाव असून, स्वत:ला त्याने मुंबईतील रहिवासी असल्याचे म्हटले आहे. गाडगे यांच्या तक्रारीनुसार, गेल्या सात दिवसांपासून आरोपी त्यांना फोन करतो. फोनमध्ये त्याने गोपाल कोंडावर प्रकरणाचा उल्लेख करून त्यात यापुढे हिशेबाने राहा, अन्यथा तुला उचलून घेईन, अशी धमकी दिली. तो माझा पार्टनर आहे, तू तक्रार केली त्यामुळे खूप त्रास झाला आणि खर्चही झाला. त्यामुळे पाच कोटी रुपये द्यावे लागतील. आता फोनवरून समजावून सांगत आहे, यानंतर सांगणार नाही. जास्त गडबड गोंधळ (शोर शायनिंग) न करता रात्रीपर्यंत पाच कोटी रुपये तयार ठेव. अन्यथा तुला घरून उचलून नेईल, अशी धमकी दिली.
गाडगे यांनी त्याला पाच रुपयेसुद्धा देणार नाही. कधी उचलायचे आहे तेव्हा उचल, असे म्हटले असता आरोपीने त्यांना घरचा पत्ता पाठव, असे म्हटले. विशेष म्हणजे, सात दिवसांत तीन वेळा फोन करणाऱ्या या आरोपीने पहिल्या वेळी आवाज बदलून बोलण्याचा प्रयत्न केला. तो खंडणीची मागणी करून शिवीगाळ करत असल्याचे तसेच धमकी देत असल्याने अखेेर सोमवारी दुपारी गाडगे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर तपासाची चक्रे हलली. त्यानंतर बजाजनगर ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी वृत्त लिहिले तरी गुन्हा दाखल झाला नव्हता.
असे आले कॉल्स
८ फेब्रुवारी २०२२
पहिल्या वेळी आरोपीने फोन करून प्रफुल्लजी बात कर रहे क्या, अशी विचारणा केली. यावेळी गाडगे यांनी हो म्हणताच त्याने गोपाल कोंडावार हा माझा पार्टनर आहे, त्याच्याबद्दल जी तक्रार केली. ती सांभाळून करा, अन्यथा उचलून घेईल, अशी धमकी दिली. यावेळी आरोपीने गाडगे यांना शिवीगाळही केली.
९ फेब्रुवारी २०२२
दुसऱ्यांदा फोन केला तेव्हा कथित साैरभ द्विवेदी याने फालतू या प्रकरणात पुढे जाऊ नको असा सल्ला दिला. यावेळी त्याचा स्वर बदलला होता.
१४ फेब्रुवारी २०२२
आज कथित साैरभने तिसरा फोन केला तेव्हा पोलिसांत केलेल्या कारवाईमुळे आपल्याला खूप खर्च आला. तू पाच कोटी रुपये रात्रीपर्यंत तयार ठेव, अन्यथा तुला उचलून घेईल,असे म्हटले. जास्त गडबड गोंधळ करू नको, यावेळी तुला समजावले. यानंतर फोन करणार नाही. सरळ घरून उचलून नेईल, अशी धमकीही दिली.