नागपूर : स्टार एअर कंपनीची (उडे देश का आम नागरिक) विमानसेवा नागपुरातून शनिवारी सुरू झाली आहे. बेळगाव येथून ५० सीटांच्या विमानात संपूर्ण ५० प्रवासी नागपुरात पोहोचले. त्यानंतर विमान ४५ प्रवाशांसह नागपुरातून बेळगावकडे रवाना झाले.
कोल्हापूर येथील संजय घोडावत समूहाची स्टार एअरलाइन्स रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस (आरसीएस) अंतर्गत सध्या आठवड्यात दोन दिवस शनिवार आणि मंगळवारी उड्डाण भरणार आहे. एस ५-१४७ बेळगाव-नागपूर विमान सकाळी १० वाजता नागपुरात येईल आणि एस ५-१४८ नागपूर-बेळगाव सकाळी १०.३० वाजता रवाना होईल. उड्डाणांचे संचालन एंबरर १४५ विमानांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हे विमान नागपूर-बेळगावचे अंतर दीड तासात कापते. शनिवारी नागपुरातून टेक ऑफआधी मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रूह, अधिकारी लक्ष्मीनारायण आणि सीआयएसएफचे उपकमांडंट रवी कुमार यांनी उड्डाणाचे उद्घाटन केले.
बेळगावहून कनेक्टिव्हिटी
या विमानाने नागपुरातून बेळगावला पोहोचल्यानंतर हुगळी, गोवा व कोल्हापूरपर्यंत रस्तेमार्गाने केवळ दीड तासात पोहोचता येते. यासह कंपनीची बेळगावहून जोधपूर, मुंबई आणि अहमदाबाद शहरांकरिता कनेक्टिव्हिटी आहे.