वसीम कुरेशी
नागपूर : प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर नागपूरवरून १६ एप्रिलपासून रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस (आरसीएस) फ्लाइट सुरू होणार आहे. ही फ्लाइट नागपूरवरून बेळगावसाठी राहणार आहे. त्याच्या तयारीसाठी बुधवारी दुपारी एअरलाइन्स व विमानतळ व्यवस्थापनाशी निगडित अधिकाऱ्यांची बैठक झाली.
‘उडे देश का आम नागरिक’ म्हणजे उड्डाण योजनेनुसार गेल्या तीन वर्षांपासून उपराजधानी नवी फ्लाइट मिळण्याची वाट पाहत होती. गेल्या वर्षी स्टार एअरलाइन्सने नागपूरवरून बेळगावला फ्लाइट सुरू करण्याची तयारी केली होती. परंतु कोरोनामुळे ही फ्लाइट सुरू होऊ शकली नाही. आता स्टार एअरलाईन्स ही फ्लाइट संचालित करण्यासाठी तयार आहे. एप्रिल व मेपर्यंत ही फ्लाइट आठवड्यातून दोन वेळा राहणार आहे. या फ्लाइटसाठी एम्बरर १४५ विमानाचा वापर करण्यात येणार आहे. या विमानाची प्रवासी क्षमता १५० सीटर आहे. स्टार एअरलाईन्सने विमानतळावर काऊंटरसाठी जागेची निवड केली आहे.
हे आहे फ्लाइटचे शेड्युल
मंगळवारी आणि शनिवारी बेळगाववरून डिपार्चर सकाळी ८.३० वाजता, नागपूर आगमन १० वाजता
- नागपूरवरून सकाळी १०.३० वाजता डिपार्चर आणि दुपारी १२ वाजता बेळगावला आगमन
दोन महिन्यांनंतर दररोज
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चालविल्यानंतर जूनपासून ही फ्लाइट दररोज सुरू राहणार आहे. बेळगाव कोल्हापूरच्या जवळ असल्यामुळे या फ्लाइटला चांगले प्रवासी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर या फ्लाइटचे भाडे अपेक्षेपेक्षा कमी राहणार आहेत.