नागपूर भाजप कार्यकर्त्यांची रेल्वेगाडी चुकली; वेळेबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:09 AM2018-04-05T11:09:12+5:302018-04-05T12:53:59+5:30
मुंबई येथे भाजपच्या वर्धापन दिनासाठी नागपूरहून निघणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत संभ्रम झाल्याने ही गाडी केवळ ३० कार्यकर्ते घेऊन नागपुरातून सकाळी रवाना झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मुंबई येथे भाजपच्या वर्धापन दिनासाठी नागपूरहून निघणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत संभ्रम झाल्याने ही गाडी केवळ ३० कार्यकर्ते घेऊन नागपुरातून सकाळी रवाना झाली. वेळेबाबत रेल्वे प्रशासनात संभ्रम झाल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भाजपाने मुंबईसाठी आयआरसीटीसी कडे नागपूर-मुंबई अशी गाडी बुक केली होती. तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांना निरोप देताना भाजपने ती वेळ चुकून १० अशी सांगितल्याने ही गाडी सकाळी उत्साहाने स्टेशनवर लवकर आलेल्या थोड्याफार कार्यकर्त्यांना घेऊन रवाना झाली. गाडी निघाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला.
या गोंधळाला सोडवण्यासाठी मग रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती वर्ध्याऐवजी नागपूरहून निघत असल्याचे जाहीर केले. भाजपने जाहीर केलेल्या पत्रकात नागपुरातून ५ हजार कार्यकर्ते घेऊन जाणारी गाडी सकाळी १० वाजता अजनी रेल्वे स्थानकावरून निघेल असे नमूद केले आहे. प्रत्यक्षात मात्र या रेल्वेची वेळ ही ७.५० अशी होती. रेल्वे प्रशासनाने नियोजित वेळेनुसार ती रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ केली. यावेळी भाजपचे केवळ ३० कार्यकर्ते स्थानकात हजर होते.
आयआरसीटीसीने भाजपला ७.५० ची वेळ दिली होती. परंतु समन्वयाअभावी संभ्रम निर्माण झाला आणि कार्यकत्यांना १० ची वेळ समजली. रेल्वेने ठरवून दिलेल्या वेळेनुसार ही गाडी रवाना केली. अॅडजेस्टमेंट म्हणून वर्ध्याहून जी स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार होती तीसुद्धा नागपूरहून पाठवण्यात येणार होती. ती गाडी आता वर्ध्याला न पाठवता नागपूरहून सोडण्यात आली.
कुशकिशोर मिश्रा
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक
मध्यरेल्वे नागपूर विभाग.