नागपूर ग्राहक मंचचा आदेश : ग्राहकाचे दोन लाख १० टक्के व्याजाने परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:18 AM2018-12-07T01:18:21+5:302018-12-07T01:19:53+5:30
ग्राहकाचे दोन लाख रुपये १० टक्के व्याजाने परत करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने रविनगर चौकातील विदर्भ मोटर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई मंजूर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राहकाचे दोन लाख रुपये १० टक्के व्याजाने परत करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने रविनगर चौकातील विदर्भ मोटर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई मंजूर केली.
मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. दोन लाख रुपयावर २२ डिसेंबर २०१७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू होणार आहे. शशिकांत गजभिये असे ग्राहकाचे नाव असून, ते भामटी येथील रहिवासी आहेत. गजभिये यांनी विदर्भ मोटर्सकडून दोन लाख रुपयात जुनी कार खरेदी केली होती. २६ सप्टेंबर २०१६ रोजी रक्कम अदा केल्यानंतर विदर्भ मोटर्सने त्यांना डिलिव्हरी नोट करून दिली. त्यानंतर गाडीची कागदपत्रे गजभिये यांच्या नावावर करून देण्यात आली नाहीत. दरम्यान, मूळ मालक विनोद पाटील हे ती कार घरी घेऊन गेले. त्यामुळे गजभिये यांनी २० नोव्हेंबर २०१७ रोजी विदर्भ मोटर्सला नोटीस पाठविली. परंतु, त्यांना कार व पैसे दोन्ही मिळाले नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम १२ अंतर्गत मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने विविध बाबी लक्षात घेता, वरीलप्रमाणे निर्णय देऊन विदर्भ मोटर्सला दणका दिला.