निशांत वानखेडे
नागपूर : शहरातील हवा दिवसेंदिवस धाेकादायक प्रदूषणाचा स्तर गाठत असून नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी)च्या नाेंदीद्वारे नागपूर शहराच्या स्थितीचे अवलाेकन करता येते. सीपीसीबीने या उन्हाळ्यात घेतलेल्या नाेंदी धक्कादायक आहेत. यानुसार एप्रिल महिन्यात ३० दिवसांपैकी १७ दिवस आणि मे महिन्यात तब्बल २१ दिवस शहराच्या प्रदूषणाने धाेक्याचा स्तर पार केला.
यावर्षी उन्हाळ्यात तीन-चार उष्ण लहरींनी नागपूरकर हाेरपळले आहेत. अशात एकीकडे उन्हाचा तडाखा सुरू असताना प्रदूषणाचा मारही नागपूरकरांवर पडत आहे. काेराेनाचा विळखा ओसरल्यानंतर जनजीवन सामान्य झाले आहे. तसे प्रदूषणाचा स्तरही उच्चस्तर गाठत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रदूषणाची पातळी वाढली आहे. वाढलेली वाहतूक व माेठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे धूलिकणांचेही प्रदूषण वाढले आहे. सीपीसीबीने घेतलेल्या नाेंदीचे अवलाेकन केले असता गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रदूषणाच्या स्तरात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मे महिन्यात आतापर्यंतच्या २९ दिवसात २१ दिवस प्रदूषणाचा स्तर उच्चांकीवर हाेता. यातील ३ दिवस अतिप्रदूषित आणि केवळ दाेन दिवस स्थिती चांगली हाेती. एप्रिल महिन्यात १७ दिवस प्रदूषित आणि ११ दिवस हवेची गुणवत्ता चांगली हाेती.
हवेच्या इंडेक्सनुसार ० ते ५० एक्यूआय असणे म्हणजे चांगली स्थिती. ५० ते १०० एक्यूआय असणे म्हणजे आजारी व संवेदनशील लाेकांसाठी वाईट असते. १०० च्यावर इंडेक्स असणे म्हणजे हवेतील प्रदूषणाचा स्तर धाेकादायक स्थितीत पाेहचणे हाेय आणि २०० च्यावर एक्यूआय म्हणजे अतिधाेकादायक स्थिती हाेय. त्याुनसार एप्रिल महिन्यात २१ राेजी अतिधाेकादायक स्थितीत पाेहचले हाेते. तर मे महिन्यात ७, ८ व ९ मे राेजी प्रदूषणाचा स्तर २०० च्या पार पाेहचलेला हाेता.
नागपूरचे उन्हाळ्यातील प्रदूषण
*मार्च*
एकूण दिवस ३१
चांगले- २२
प्रदूषित- ६
आकडेवारी उपलब्ध नाही- ३
*एप्रिल*
एकूण दिवस ३०
चांगले दिवस ११
प्रदूषित १७
अतिप्रदूषित ०१
माहिती उपलब्ध नाही ०१
*मे*
एकूण दिवस २९
चांगले ०२
प्रदूषित २१
अतिप्रदूषित ०३
माहिती उपलब्ध नाही ०३