ठळक मुद्देकेळीच्या बागेत दिवसभर ठिय्या : पकडण्याऐवजी हुसकवण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पट्टेदार वाघाने हिंगणा तालुक्यातील सावंगी - देवळी शिवारात असलेल्या पुरुषोत्तम गोतमारे यांच्या शेतातील केळीच्या बागेत मंगळवारी सकाळी शिरकाव केला. वाघाचा बागेत दिवसभर ठिय्या होता. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतात दाखल झाले. त्यांनी त्या वाघाला पकडण्याऐवजी हुसकावून लावण्याचा दिवसभर प्रयत्न केला. परंतु, त्यांना सायंकाळपर्यंत यश आले नव्हते.सावंगी (ता. हिंगणा)चे माजी सरपंच पुरुषोत्तम गोतमारे यांची सावंगी - बोरगाव रस्त्यालगत शेती असून, शेतात केळीची बाग आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरांना सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास केळीच्या बागेतून वाघ बाहेर पडत असल्याचे दिसले. त्यांनी सदर माहिती लगेच पुरुषोत्तम गोतमारे यांनी दिली. त्यांनी लगेच शेत गाठले तर जिल्हा परिषद सदस्य उज्वला बोढारे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांना माहिती दिली. काही वेळातच नागपूर येथील ‘रेस्क्यू टीम’ शेतात पोहोचली. त्यांनी बागेच्या एका भागाला जाळी बांधून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी फटाकेही फोडण्यात आले.वाघ मध्यंतरी बागेच्या बाहेर आला आणि रानडुकराची शिकार करून पुन्हा बागेत शिरला. त्याला पकडणे शक्य नसल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी त्याला हुसकावून लावणे गरजेचे आहे, अशी माहिती आरएफओ रामदास निंबेकर व सहायक विनायक उमाळे यांनी संयुक्तरीत्या दिली. उन्हाळ्यात जंगलातील पाणीटंचाईमुळे वन्यप्राणी खाद्य व पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे येत असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. या शिवारातील शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी तसेच वन्यप्राण्यांविषयीची माहिती वन विभागाला द्यावी, असे आवाहन वन अधिकाऱ्यांसह उज्वला बोढारे यांनी केले. पुरुषोत्तम गोतमारे, अनिल क्षीरसागर, प्रेमदास येणूरकर, प्रशांत सोनवणे, चंदू येणूरकर, अक्षय बोढारे, राजू गोतमारे, देवराव दगडे, चंद्रशेखी डडमल यांनी वन कर्मचाऱ्यांना मदत केली.