नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या ९० वर रुग्णांना गमवावे लागले डोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 10:32 AM2021-06-15T10:32:32+5:302021-06-15T10:34:39+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १३८५ रुग्णांची नोंद झाली असून १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, ९९८ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असून जवळपास ९० वर रुग्णांना आपले डोळे गमाविण्याची वेळ आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा वाढलेला धोका काहीसा कमी होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, खासगीच्या तुलनेत शासकीय रुग्णालयात अधिक रुग्ण दिसून येत आहेत. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १३८५ रुग्णांची नोंद झाली असून १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, ९९८ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असून जवळपास ९० वर रुग्णांना आपले डोळे गमाविण्याची वेळ आली.
कोरोना नियंत्रणात आला असताना म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. एम्स, मेयो, मेडिकल व लता मंगेशकर हॉस्पिटल या शासकीय रुग्णालयांमध्ये रविवारी १२, तर खासगी रुग्णालयांत ४ रुग्णांची नोंद झाली. शासकीय रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ४५४ रुग्ण व २५ मृत्यू, तर खासगी रुग्णालयात ९३१ रुग्ण व १०३ मृत्यू झाले आहेत. सध्या शासकीय रुग्णालयात २९७, खासगीमध्ये १८९ असे एकूण ४८६ रुग्ण उपचार घेत आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात २६६, खासगी रुग्णालयात ७३२ अशा एकूण ९९८ शस्त्रक्रिया केल्या आहेत. यातील ९० वर रुग्णांचा एक डोळा काढावा लागला आहे. आतापर्यंत ७७१ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.
- डोळा गमाविणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट
सुरुवातीला या आजाराची विशेष माहिती नसल्याने अनेक रुग्ण गंभीर होऊन रुग्णालयात येत होते. विशेषत: खासगी रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या वाढली होती. तज्ज्ञांनुसार, काळी बुरशी डोळ्यापर्यंत पोहोचल्याने जवळपास ९० वर रुग्णांचा एक डोळा काढण्याची वेळ आली. परंतु आता कोरोना असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असतानाच म्युकरमायकोसिसची चाचणी केली जात असल्याने व जे कोरोनातून बरे झाले आहेत, ते लक्षणे दिसताच चाचणी करीत असल्याने गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. विशेषत: डोळा गमाविणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट आली आहे.
- औषधांचा तुटवडा कायम
म्युकरमायकोसिसवर प्रभावी असलेल्या ‘अॅम्पोटेरिसीन बी लायपोसोमल’ या इंजेक्शनचा तुटवडा अद्यापही कायम आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयांना सहज हे इंजेक्शन मिळत नसल्याचे चित्र आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी साठा उपलब्ध होतो. त्यातही एक दिवसआड इंजेक्शन मिळत असल्याच्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. खासगी रुग्णालयातही या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव थांबलेली नाही.
ही आहेत लक्षणे...
म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यास नाक बंद होणे, डोळे दुखणे, चेहऱ्यावर बधीरता येणे, दिसायला कमी किंवा दोन प्रतिमा दिसणे, डोळ्याला सूज येणे, डोळा लाल होणे, डोळे दुखून उलटी होणे, नाकातून रक्त किंवा काळा स्त्राव येणे आदी लक्षणे दिसून येऊ शकतात.
ही घ्या काळजी...
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी किंवा धूळ असलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची रोज रक्तशर्कराची चाचणी करावी. रुग्णालयातून सुटी झाल्यावर मधुमेह नियंत्रणात ठेवावा. आहाराचे नियम पाळावेत. मातीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क व पूर्ण कपडे घालावेत.
-पूर्वीच्या तुलनेत रुग्ण कमी झाले
एप्रिल व मे महिन्याच्या तुलनेत सध्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत निश्चितच घट झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत गंभीर लक्षणे घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. मात्र, शासकीय रुग्णालयात या रुग्णांची संख्या कायम आहे. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये. लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रशांत निखाडे, अध्यक्ष, टास्क फोर्स म्युकरमायकोसिस