नागपूर जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचे तांदूळ पोहचूनही विद्यार्थी उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:08 AM2018-02-03T10:08:44+5:302018-02-03T10:11:01+5:30
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. परंतु या तांदळाची विद्यार्थ्यांसाठी खिचडीच तयार होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. परंतु या तांदळाची विद्यार्थ्यांसाठी खिचडीच तयार होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिघोरी परिसरातील सर्वश्रीनगरातील सर्वश्री उच्च प्राथमिक शाळेत गेल्या सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला गेला नाही. तक्रारीच्या अनुषंगाने शालेय पोषण आहार विभागाने तपासणी केली असता, शाळेत ४०० किलो अतिरिक्त तांदूळ आढळला आहे.
प्रजासत्ताक शिक्षक, कर्मचारी संघाच्यावतीने सर्वश्री उच्च प्राथमिक शाळेत गेल्या सहा महिन्यापासून खिचडी बनली नसल्याची तक्रार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. संघटनेच्या तक्रारीनुसार शालेय पोषण आहाराच्या बिलामध्ये अनियमितता झाली आहे. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात माहितीही मागितली होती. परंतु कार्यालयाकडून माहिती उपलब्ध करून दिली नसली तरी, पोषण आहार अधीक्षकांनी या तक्रारीच्या अनुषंगाने शाळेची चौकशी केली. गुरुवारी करण्यात आलेल्या चौकशीत शाळेमध्ये ४०० किलो तांदूळ अतिरिक्त आढळला.
गेल्या सहा महिन्यापासून शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी दिल्या जात नाही, त्यामुळे हा तांदूळ जातो कुठे हा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे आहे. यापूर्वी शहरातील एका शाळेत पोषण आहाराचा तांदूळ जमिनीत पुरण्यात आल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना सहा-सहा महिने पोषण आहार मिळत नसेल, याची साधी दखलही शिक्षण विभागाकडून घेतली जात नसेल, तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे.
यासंदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी माहिती घेतो असे सांगितले, परंतु त्यांच्याकडून माहिती देण्यात आली नाही.
खिचडी शिजलीच नाही, तर बिल मंजूर कसे ?
संघटनेचा आरोप आहे की, सहा महिन्यापासून खिचडी शिजलीच नाही तरीही पोषण आहाराचे बिल पदावर नसलेल्या व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या करून मंजूर करण्यात आले आहे.
कारवाई नक्कीच होणार
शाळेत चौकशीदरम्यान ४०० किलो तांदूळ अतिरिक्त आढळला आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार का दिला जात नाही, याची विस्तृत चौकशी होणार आहे. शाळेच्या सचिवाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उपाशी ठेवणाऱ्यांवर नक्कीच दंडात्मक कारवाई होईल.
- उकेश चव्हाण, सभापती, शिक्षण समिती