नागपूर जिल्हा ‘जलयुक्त’कडून दुष्काळ’मुक्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:10 AM2019-07-29T11:10:27+5:302019-07-29T11:13:36+5:30
जिल्ह्यातील १३ पैकी नरखेड व काटोल तालुके ‘डार्क झोन’मध्ये आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे या दोन्हीसह इतर ११ तालुक्यांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे.
सुनील चरपे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील १३ पैकी नरखेड व काटोल तालुके ‘डार्क झोन’मध्ये आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे या दोन्हीसह इतर ११ तालुक्यांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. संरक्षित सिंचनाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे सावनेरसह रामटेक, कुही, पारशिवनी व अन्य तालुक्यात जलसंधारणाची कामे करून तेथील पाणीसमस्या कायम दूर करणे गरजेचे आहे. शिवाय, या कामाच्या दर्जाबाबत रामटेक व उमरेड तालुक्यात तक्रारी प्राप्त झाल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.
काटोल तालुका अव्वल
‘ऑरेंज बेल्ट’ म्हणून ओळख असलेला तसेच ‘डार्क झोन’मध्ये गेलेला काटोल तालुका जलयुक्त शिवार अभियानात अव्वल राहिला आहे. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या काळात काटोल तालुक्यातील १३४ गावांमध्ये या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यात आली. या तालुक्याच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करीत असलेला हा तालुका अभियानामध्ये जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
जलयुक्त शिवार कामे
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भूजल पुनर्भरण व संरक्षित सिंचन क्षमता वाढविण्यासाठी नाला, विविध तलाव व लघु सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढणे, नाल्याचे खोलीकरण करून त्यावर मातीबांध, सीसीटी, दगडीबांध, गॅबियन बंधारे, भात खचरे (धानाच्या बांध्या), शेततळ्यांची निर्मिती करणे, सार्वजनिक व खासगी विहिरींचे पुनरुज्जीवन व खोलीकरण करून त्यांचे पुनर्भरण करणे, जनजागृती करणे, जमिनीची धूप टाळण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन आदी कामे करण्यात आली.
जलयुक्त शिवारचा फायदा डार्क झोनमधील काटोल व नरखेड तालुक्याला झाला. नाला खोलीकरण, बंधारे पुनरुज्जीवनामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. दोन वर्षातही मोठ्या प्रमाणात कामे झाली.
- संदीप सरोदे,
या अभियानांतर्गत करण्यात आलेली कामे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली आहेत. शेतकऱ्यांची भांडणे टाळण्यासाठी नाल्याच्या खोलीकरणाची लांबी वाढवून कामाच्या दर्जात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे.
- महेंद्र दिवटे,
माजी सरपंच, भंडारबोडी, ता. रामटेक.माजी सभापती, पंचायत समिती, काटोल.