शांतता यात्रेत नागपूरच्याही डॉक्टरांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:50 AM2020-01-22T00:50:28+5:302020-01-22T00:51:49+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) १२ मार्चला साबरमती येथील आश्रमातून शांतता यात्रा काढण्यात येणार आहे. यात देशभरातून २५ हजार डॉक्टर सहभागी होणार असून, नागपुरातील डॉक्टरांचाही समावेश असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉक्टरांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. याविरोधात केंद्रीय पातळीवर कठोर असा कायदा करावा, ‘नॅशनल मेडिकल कमिशन’मधील काही तरतुदी वगळण्यात याव्यात तर काहींमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) १२ मार्चला साबरमती येथील आश्रमातून शांतता यात्रा काढण्यात येणार आहे. यात देशभरातून २५ हजार डॉक्टर सहभागी होणार असून, नागपुरातील डॉक्टरांचाही समावेश असणार आहे.
नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे डॉक्टर्स, शिकाऊ डॉक्टर, सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे, या विधेयकामुळे शिकाऊ डॉक्टरांच्या हिताला बाधा पोहचत आहे. त्यामुळे देशभरातील शिकाऊ व निवासी डॉक्टर्स यांनी या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले, संपही पुकारला. परंतु केंद्र शासनाने अद्यापही याची दखल घेतली नाही. यामुळे आमदारांपासून ते खासदार आणि नेत्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत ‘आयएमए’ने निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ‘आयएमए’ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे यांनी दिली.
डॉक्टर व रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी ‘द हेल्थकेअर सर्व्हिस पर्सन्स अॅण्ड हेल्थ केअर सर्व्हिस इन्स्टिट्युशन्स’ हे विधेयक संसदेत सादर केले जाणार होते, पण गृहखात्याने अचानक ते विधेयक मागे घेतले. देशातील २२ राज्यांमध्ये हा कायदा आहे; पण केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ‘आयएमए’तर्फे करण्यात आला आहे. या दोन्ही विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शांतता यात्रेत मोठ्या संख्येत डॉक्टर सहभागी होणार आहेत. यात नागपुरातील २५ वर डॉक्टर सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘आयएमए’ नागपूरचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी दिली.