नागपुरात उधारीच्या पैशावरून मित्रावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:43 PM2019-07-03T22:43:10+5:302019-07-03T22:44:13+5:30
उधारीच्या पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणावर मित्राने साथीदाराच्या मदतीने हल्ला करून जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उधारीच्या पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणावर मित्राने साथीदाराच्या मदतीने हल्ला करून जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी निखिलेश जगन कुंभारे (३०), रा. सिहोर, ता. तुमसर, भंडारा याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये नकुल राजू मेरखेडे (२५) लालगंज, सुरेंद्र्र माणिकराव डोळे (२७) रा. गंजीपेठ, गणेशपेठ, प्रताप मोहन गौर (२३) रा. बजेरिया व त्यांचे इतर साथीदार यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिलेश आणि नकुल हे दोघे मित्र आहेत. नकुलने निखिलेशला ३० हजार रुपये उधार दिले होते. मात्र खूप दिवस होऊनही निखिल पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत होता. नकुलने त्याला पैसे परत करण्यावरून अनेकदा बजावले होते. मात्र निखिलेश त्याला पैसे परत करत नव्हता. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता निखिलेश हा मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकावर असल्याची माहिती नकुलला मिळाली. या माहितीवरून नकुल, सुरेंद्र, प्रताप आणि अन्य तीन जण बसस्थानकावर गेले. त्यांनी निखिलेशला गाठून पैशाची मागणी केली. निखिलेशने नेहमीप्रमाणे पैसे देण्यास टाळाटाळ केली. यामुळे संतापलेल्या नकुलने मित्रांच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला. शिवीगाळ करून हातबुक्कीने जबर मारहाण करण्यात आली. पैसे परत न केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.