नागपूरने मला बरंच काही दिले, ऋण फेडणे हे माझे कर्तव्य : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:20 PM2019-03-28T23:20:21+5:302019-03-28T23:21:55+5:30
मागील पाच वर्षांत कधी नव्हे तो नागपूरचा वेगाने विकास होत आहे. अगोदर विकासाचा वेग एखाद्या ‘एक्स्प्रेस ट्रेन’सारखा होता. मात्र आता ‘बुलेट ट्रेन’ची गती आली आहे. भविष्यातील नागपूर हे एक जागतिक दर्जाचे शहर असेल आणि देशात विकासाचा एक आदर्श राज्याची उपराजधानी प्रस्थापित करेल. जनतेने मला साथ दिली व त्यामुळेच विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली. मी वेगळे काहीही केलेले नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधीची ही जबाबदारीच आहे. नागपूरने माझ्यावर संस्कार केले आहेत. माझ्या व्यक्तिमत्त्वात नागपूर ठासून भरलेले आहे. या शहराने मला सर्व काही दिले. त्यामुळे शहराचे ऋण फेडणे हे माझे कर्तव्यच असल्याचे मी समजतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील पाच वर्षांत कधी नव्हे तो नागपूरचा वेगाने विकास होत आहे. अगोदर विकासाचा वेग एखाद्या ‘एक्स्प्रेस ट्रेन’सारखा होता. मात्र आता ‘बुलेट ट्रेन’ची गती आली आहे. भविष्यातील नागपूर हे एक जागतिक दर्जाचे शहर असेल आणि देशात विकासाचा एक आदर्श राज्याची उपराजधानी प्रस्थापित करेल. जनतेने मला साथ दिली व त्यामुळेच विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली. मी वेगळे काहीही केलेले नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधीची ही जबाबदारीच आहे. नागपूरने माझ्यावर संस्कार केले आहेत. माझ्या व्यक्तिमत्त्वात नागपूर ठासून भरलेले आहे. या शहराने मला सर्व काही दिले. त्यामुळे शहराचे ऋण फेडणे हे माझे कर्तव्यच असल्याचे मी समजतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. बुधवारी रात्री यांनी ‘लोकमत’ला भेट दिली व त्यांनी वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते.
७२ हजार कोटींची कामे सुरू
नागपूरच्या विकासाची ही सुरुवात आहे असे मी मानतो. सद्यस्थितीत नागपुरात थोडीथोडकी नव्हे तर ७२ हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत. यातील अनेक कामांची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. देशातील सर्वोत्तम शहराचा दर्जा नागपूरला मिळवून द्यायचा असेल तर तशा सुविधादेखील निर्माण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पावले उचलण्यात आली असून शहराचे चित्र पालटायला सुरुवात झाली आहे. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात गेल्या सहा महिन्यांपासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. विकास कामांना गती मिळाल्याने नागपूरने अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
जागतिक कंपन्यांचे शहराकडे लक्ष
नागपूर ‘मेट्रो’ला सुरुवात झाल्याने शहराचा दर्जा वाढला आहे. लवकरच ‘मेट्रो’ पूर्ण क्षमतेने धावायला लागेल. शहरात दर्जेदार राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आल्या आहेत. आज नागपूरची देशात शैक्षणिक ‘हब’ म्हणून ओळख प्रस्थापित झाली आहे. ‘इन्फोसिस’, ‘टीसीएस’, ‘एचसीएल’ यांच्यासह विविध ‘आयटी’ कंपन्यांचे ‘मिहान’मध्ये काम सुरू झाले आहे. उद्योगधंद्यांना आवश्यक असे पोषक वातावरण येथे तयार झाले आहे. जागतिक पातळीवरील अनेक मोठ्या कंपन्यांची नागपूरकडे नजर आहे व भविष्यात नागपुरातील गुंतवणूक नक्कीच वाढेल.
नागनदी स्वच्छ करणारच
नागनदीच्या मुद्द्यावरुन शहरात अ़नेकदा राजकारण होते. मात्र हा मुद्दा राजकारणाशी जोडणे अयोग्य आहे. नागनदीसाठी १५०० कोटी मंजूर झाले आहेत व लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. नागनदी ही शहराची ओळख झाली पाहिजे व या नदीला स्वच्छ करण्याची मी प्रतिज्ञाच घेतली आहे. कानपूरमध्ये सांडपाण्याची प्रचंड समस्या होती. आम्ही १४० एमएलडी पाण्यावर पुन:प्रक्रियेला सुरुवात केली. नागनदीचेदेखील रुप पालटून दाखवेलच.
शहरातील बाजारपेठांचा विकास
रेल्वे स्थानकाजवळील पूल पाडण्याची निविदा प्रक्रियादेखील सुरू झाली असेल. यामुळे मोठा मार्ग तयार होईल. याशिवाय यशवंत स्टेडियम, फुले मार्केट, संत्रा मार्केट यांच्या जागेवर अत्याधुनिक बाजार असलेल्या इमारती उभ्या राहणार आहेत. बाजारपेठांचा विकास झाला तर त्याचा फायदा लहान मोठे व्यापारी यांना तर पोहोचेलच शिवाय ग्राहकांसाठीदेखील सोयीस्कर होईल.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही
मला देशाचा पंतप्रधान व्हायचे नाही. मी कधीच कुणाला बायोडाटा दिला नाही. कधी कुणाचे पोस्टर्स लावले नाही. माझ्या स्वागतासाठी विमानतळावर कुणी येत नाही. मला जे मिळाले आहे त्यात मी समाधानी आहे. माझा स्वभाव असा आहे की मी ज्याला मित्र मानतो त्याच्यासोबत नेहमी उभा राहतो. जे येतात त्यांचे काम करतो. जर काम होत असेल तर व्यक्ती कुठल्याही पक्षाची असो, ते काम करतोच. हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे. माझा स्वभाव पारदर्शक आहे. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही ही बाब स्पष्ट आहे.
घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार
नागपुरातील पर्यटनस्थळांचा विकास करणे हे ध्येय आहे. फुटाळा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘म्युझिकल फाऊंटन’ उभे राहत आहे. नागपूर स्वच्छदेखील झाले पाहिजे. सांडपाणी व्यवस्थापनात नागपूरने देशात आदर्श निर्माण केला आहे. शहरात कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू होणार होता. मात्र तो वेळेत सुरू होऊ शकला नाही. मात्र आता यावर विशेष भर देण्यात येणार आहे व काही महिन्यातच घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
नागपूरसाठी काय करणार?
- जास्तीत जास्त रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करणार
- शहरातील पायाभूत सोईंचा विकास करुन जागतिक दर्जा मिळवून देणार
- पर्यटनस्थळ म्हणून शहराचा विकास करण्याला प्राधान्य
- शैक्षणिक व उद्योग हब करणार
- ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून ओळख निर्माण करणार
- गरिबांना परवडणाऱ्या दरात घरकुले उपलब्ध करुन देणार
- वंचितांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देणार