नागपूरकर श्वेताच्या वक्तृत्वाने पंतप्रधान प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:25 AM2019-02-28T10:25:04+5:302019-02-28T10:27:35+5:30
‘पीएम’ पासून ते अगदी ‘सीएम’ (कॉमन मॅन) पर्यंत सर्वांनाच वक्तृत्वाने मंत्रमुग्ध करण्याची किमया केली आहे ती उपराजधानीतील विद्यार्थिनी श्वेता उमरे हिने.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थळ होते नवी दिल्लीतील विज्ञान भवन सभागृह. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, प्रशासकीय अधिकारी, देशभरातील एकाहून एक सरस विद्यार्थी यांची उपस्थिती. अशा वातावरणात ती मंचावर येते अन् मुखातून जणू सरस्वतीच बाहेर पडावी, अशा विश्वासाने शब्दामृत मांडते. काही क्षणातच टाळ्यांच्या कडकडाटात सभागृह उचलून धरते. ती येते, बोलते अन् पहिला क्रमांक जिंकून जाते काय, सर्वच काही अविश्वसनीय. ‘पीएम’ पासून ते अगदी ‘सीएम’ (कॉमन मॅन) पर्यंत सर्वांनाच वक्तृत्वाने मंत्रमुग्ध करण्याची किमया केली आहे ती उपराजधानीतील विद्यार्थिनी श्वेता उमरे हिने. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात श्वेताने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शासकीय ‘फॉरेन्सिक सायन्स’ संस्थेतील अंतिम वर्षाला शिकत आहे.
राष्ट्रीय पातळीवर वक्तृत्वस्पर्धांमध्ये मोठ्या शहरातील विद्यार्थीच बाजी मारुन जातात असा सर्वसाधारण समज आहे. मात्र नागपुरातील श्वेता हिने असा समज खोडून काढत ‘हम भी किसीसे कम नही’ असाच संदेश दिला. मंचावर आल्यानंतर तिच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दातील शुद्धता, बोलण्यामधील लयबद्धता, चेहऱ्यावरील आत्मविश्वास, मुद्द्यांमधील तथ्य आणि देशाबद्दलचा अभिमान याने अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील प्रभावित केले.
‘आर्थिक-भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारत देशाचा बंध’ या विषयावर तिने आपले मत मांडले. यावेळी तिने ‘हेरिटेज टुरिझम’ व त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा प्रभाव तसेच देशातील तरुणांचे मनुष्यबळ व त्यातील शक्ती यावर भाष्य केले. जर तरुणांनी आपली जबाबदारी व कर्तव्ये समजून त्यावर अंमलबजावणी केली तर आपोआपच देशात प्रेम, आदर व शांतीचे वातावरण तयार होईल, असे मत तिने व्यक्त केले. तिने आपल्या वक्तृत्वातून देशाची परंपरा, संस्कृती यांची मांडणीच केली नाही तर तरुणांना स्वत:ची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहनदेखील केले. तिने पटकाविलेला पहिला क्रमांक हा नागपुरातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व दोन लाख रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरुप होते.
८८ हजार विद्यार्थ्यांतून झाली निवड
जे विद्यार्थी मतदान तर करू शकतात मात्र वयाच्या अटीमुळे निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत त्यांची मतं व कल्पना ऐकण्याची बाब पंतप्रधानांनी ‘मन के बात’मध्ये मांडली होती. त्यानंतर राष्ट्रीय युवा संसदेच्या मंचच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचे ठरविण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे देशपातळीवर यासाठी चाचणी घेण्यात आली. यात ८८ हजार विद्यार्थी सहभागी झाली होती. श्वेताची अगोदर नागपूर शहर, त्यानंतर नागपूर जिल्हा अशी चाचपणी झाली. नागपूर जिल्ह्यातून तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराष्ट्राची चमू निवडण्यासाठी स्पर्धा झाली. त्यात श्वेता व वर्ध्याच्या एका विद्यार्थिनीचा समावेश झाला. प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये २८ राज्यांतील ५६ स्पर्धक सहभागी झाले होते.