नागपूर : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आ.अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या नरखेड तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीच्या निकालात भाजपाने जोरदार मुसंडी घेतली आहे. भाजपाचे विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर यांनी नरखेड तालुक्याची निवडणुक डोक्यावर घेतली होती. तालुक्यात २९ ग्रा.पं.च्या निवडणुका झाल्या. यात जाहीर झालेल्या निकालानुसार घोगरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाचे एकनाथ मानकर विजयी झाले. बानोरचंद्र ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या मंगला वसंता चौधरी, गोधणी गायमुख ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपच्या मीना सुरेशसिंग सूर्यवंशी विजयी झाल्या.
खापरी (केने) ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे मनीष विजय केने, मोहगाव (भदाडे) ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या निर्मला जयपाल चकनापूरे, विवरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे धनराज वसंत डवरे विजयी झाले. मोगरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या मीनाक्षी उमेश्वर मडके , नारसिंगी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या नलुबाई प्रवीण काकडे, भारसिंगी ग्रा.पं.च्या सरपंचपदी स्थानिक आघाडीच्या शारदा रवींद्र धवराळ विजयी झाल्या.
मोहदी (धोत्रा) ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे राजू नाखले, जुनोना (फुके) ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या प्रभा ओमप्रकाश गोतमारे विजयी झाल्या. जुनोना (फुके) भाजप नेते परिणय फुके यांचे गाव आहे. मोहदी दळवी येथे अपक्ष उमदेवार राहुल साहेबराव दळवी यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. तर खरसोली ग्रा.पं.मध्ये अजित पवार गटाच्या नीलिमा नरेश अरसडे विजयी झाल्या आहेत. नरेश अरसडे हे अजित पवार गटाचे काटोल-नरखेड विधानसभा मतदार संघाचे प्रमुख आहे.