नागपूर : मध्य प्रदेश वन विभागाच्या पथकाने महाराष्ट्राकडून आलेल्या एका शिकाऱ्याला सीमेवर अटक केली. हा शिकारी नागपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. आराेपीकडून वाघांची हाडे तसेच हरिणींचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. त्याला सिवनी जिल्ह्याच्या खवासा येथून अटक करण्यात आली.
वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्यूराेकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या विशेष पथक (एसटीएफ)ने आराेपी शिकाऱ्याला मंगळवारी रात्री उशिरा खवासा गावातून पकडल्याची माहिती उपविभागीय वन अधिकारी एस. के. जाेहरी यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डाॅ. भारत सिंह हे सातत्याने मध्य प्रदेशातील सहकारी वन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे नागपूर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारीही या प्रकरणावर कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. आराेपीचे नाव बालचंद बरकदे (४०) असून, ताे नागपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच्याकडून ८.९ किलाे वाघांची हाडे आणि हरिणाची शिंगे हस्तगत केली. कसून चाैकशी केली असता, तीन ते चार वाघांची शिकार करून अवयव विक्री केल्याची धक्कादायक कबुली आराेपीने दिल्याची माहिती जाेहरी यांनी दिली.
एवढ्या माेठ्या प्रमाणात वाघांची शिकार केल्याची कबुली केल्यामुळे आराेपी बरकदे हा वन्यजीव तस्कर व शिकाऱ्यांच्या टाेळीतील सदस्य असल्याचे आणि त्यांची टाेळी मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सक्रिय असल्याचा संशय वनविभागाला आहे. त्यामुळे त्याच्या चाैकशीतून सहकाऱ्यांपर्यंत पाेहोचण्याचा प्रयत्न विभागाने चालविला आहे. जाेहरी यांनी सांगितले की, आराेपी बरकदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविराेधात यापूर्वीही वन्यजीव तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. खवासा हे महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असून, जवळ पेंच व्याघ्र प्रकल्पाचा बराचसा भाग येताे. हे क्षेत्र वाघांच्या सातत्यपूर्ण हालचालींचे क्षेत्र आहे. त्यामुळे वनगुन्हेगार त्याचा फायदा घेत असल्याचे वन विभागाने म्हटले आहे.