नागपूर मनपाकडून आकडेवारीत अनोखे ‘मॅजिक’; ‘त्या’ १५०० मृत्यूची नोंद कुठे गेली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:30 AM2020-02-17T10:30:24+5:302020-02-17T10:31:57+5:30

मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती.

Nagpur Municipal Corporation has no records of 1500 deaths | नागपूर मनपाकडून आकडेवारीत अनोखे ‘मॅजिक’; ‘त्या’ १५०० मृत्यूची नोंद कुठे गेली ?

नागपूर मनपाकडून आकडेवारीत अनोखे ‘मॅजिक’; ‘त्या’ १५०० मृत्यूची नोंद कुठे गेली ?

Next
ठळक मुद्देघोळ इथला संपत नाही मृत्यूच्या आकड्यांमध्ये विसंगत माहिती

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती. मनपातर्फे या कालावधीत शहरात झालेल्या मृत्यूच्या माहितीसंदर्भातदेखील असाच घोळ केला आहे. वेगवेगळ्या माहिती अधिकारात एकाच कालावधीत मृत्यू पावलेल्यांची विसंगत आकडेवारी मनपातर्फे देण्यात आली आहे. २०१८ साली प्राप्त झालेल्या माहितीच्या तुलनेत २०२० साली संबंधित कालावधीबाबत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार मृत्यूच्या संख्येत तब्बल १५०० हून अधिक फरक दिसून येत आहे. विशेष म्हणजे जुन्या आकडेवारीच्या तुलनेत नवीन आकडेवारीत एकाच कालावधीतील मृत्यू घटल्याचे दाखविण्यात आले आहे. अशा स्थितीत त्या १५०० मृत्यूंची नोंद कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपराजधानीत होणाऱ्या मृत्यूची नोंद ठेवणे व आवश्यक तेव्हा दाखले उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मनपाकडून यासंदर्भात पारदर्शक कारभाराचे दावे करण्यात येत असले तरी मृत्यू नोंदींसंदर्भातील दोन माहिती अधिकारांनी मनपाची पोलखोल केली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१५ ते २०१९ या वर्षांत झालेल्या महिला व पुरुषांच्या मृत्यू आकडेवारीसंदर्भात विचारणा केली होती. मनपातर्फे ३ फेब्रुवारी २०२० रोजी अर्जावर उत्तर देण्यात आले. यानुसार या तीन वर्षांच्या कालावधीत नागपुरात ७८ हजार ३२७ मृत्यू झाले. यात ४६ हजार ८७८ पुरुष व ३१ हजार ४४९ महिलांचा समावेश होता. २०१५ मध्ये १४ हजार ८९९ पुरुष तर १० हजार १७८ महिला, २०१६ मध्ये १६ हजार ००८ पुरुष तर १० हजार ४३० महिला आणि २०१७ मध्ये १५ हजार ९७१ पुरुष व १० हजार ८४१ महिलांच्या मृत्यूची नोंद झाली.
दरम्यान ‘लोकमत’कडे याच मुद्द्यांसंदर्भातील माहिती अधिकाराच्या अर्जावर २० फेब्रुवारी २०१८ रोजी मनपाने दिलेली आकडेवारीदेखील आहे. याच्याशी तुलना केली असता मनपाने आकडेवारीत केलेला गोलमाल लक्षात आला. दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या या आकडेवारीनुसार नागपुरात २०१५ ते २०१७ याच कालावधीत शहरात ७९ हजार ९२६ मृत्यू झाले. त्यात ४८ हजार १८२ पुरुष व ३१ हजार ७४४ महिलांचा समावेश होता.
दोन्ही माहिती अधिकारातील आकडेवारीची तपासणी केली असता नव्या माहितीमध्ये चक्क जुन्या माहितीच्या तुलनेत मृत्यूची संख्या १ हजार ५९९ ने कमी दाखविण्यात आली आहे. जर २०१८ मध्ये प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०१७ या कालावधीत शहरात ७९ हजार ९२६ मृत्यू झाले होते, तर २०२० च्या माहितीनुसार याच काळातील मृत्यूची संख्या ७८ हजार ३२७ कशी काय झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Nagpur Municipal Corporation has no records of 1500 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.