नागपूर मनपा : एका तासात १०० कोटींचे प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:24 AM2019-09-10T00:24:44+5:302019-09-10T00:25:22+5:30
सोमवारी स्थायी समितीच्या विशेष बैठकीत एका तासात १०० कोटींच्या ९७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी संपूर्ण शहराचा विकास करण्याची ग्वाही दिली होती. परंतु स्थायी समिती बैठकींचा विचार करता, यात मंजुरीसाठी येणारे प्रस्ताव प्रामुख्याने पूर्व नागपुरातील असून, या भागावर अध्यक्षांची विशेष कृपादृष्टी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी स्थायी समितीच्या विशेष बैठकीत एका तासात १०० कोटींच्या ९७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
विशेष म्हणजे, ९७ प्रस्तावांपैकी ३४ प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्षांचा प्रभाग व आजूबाजूच्या प्रभागातील आहेत. यात रस्ते, नाली, संरक्षण भिंत आदी कामांचा समावेश आहे. दोन दिवसापूर्वीच्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल १३२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी स्थायी समितीने विकास कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे. शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत काही मिनिटात १३२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्याने सोमवारी प्रदीप पोहाणे यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. स्थायी समितीची बैठक एक तास चालली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कोणताही हरकतीचा मुद्दा उपस्थित न केल्याने, सर्वसंमतीने विषय मंजूर करण्यात आले. विरोधक कोणत्याही प्रस्तावावर चर्चा करीत नाही. त्यामुळे सत्तापक्षाच्या मर्जीनुसार कामकाज चालते. त्यातच सध्या पूर्व नागपुरातील एका नेत्याच्या सल्ल्यानुसार समितीचे कामकाज सुरू असल्याची महापालिकेत चर्चा आहे. त्यामुळे ज्या कामांना हिरवी झेंडी मिळाली, अशाच कामांचा कामकाजात समावेश असतो.
सोमवारच्या बैठकीत प्रदीप पोहाणे यांच्या प्रभाग २४ मधील दोन डझन फाईल्स होत्या. तसेच प्रभाग ४, २३, २५ व २६ मधील फाईल्सची संख्या अधिक होती. हुडकेश्वर-नरसाळा येथील विकास कामांचे प्रस्ताव, व्हीआयपी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या जागेवर ७.४७ कोटी खर्चाच्या जॉगिंग ट्रॅकला मंजुरी देण्यात आली. शासकीय अनुदानातून हे काम केले जाणार आहे. वास्तविक व्हीआयपी रोडच्या गुणवत्तेबाबत जनमंचने रविवारी आंदोलनकेले होते.
निधी गेला कुठे?
स्थायी समितीची बैठक दुपारी १२ च्या सुमारास पार पडली. परंतु अध्यक्षांनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले. वास्तविक बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करून माहिती दिली जाते. पोहाणे सायंकाळपर्यंत महापालिकेत होते. यादरम्यान विरोधी पक्षाचे नगरसेवक स्थायी समिती कक्षात आले. त्यांनी फाईलसंदर्भात विचारणा केली. पोहाणे यांनी निधी संपल्याचे सांगितले. यामुळे नाराज झालेल्या नगरसेवकांनी निधी गेला कु ठे, असा सवाल केला. तर फाईल मंजुरीसाठी सत्तापक्षाच्या काही नगरसेवकांनी सत्तापक्ष कार्यालयात धाव घेतली. परंतु निवडणूक संपल्यानंतर निधी मिळणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.