नागपुरातील मनपा शिक्षिकेने मिळवला विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च अवाॅर्ड; साराभाई टीचर्स सायन्टिस्ट अवाॅर्डसाठी स्पर्धेतून निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 07:59 PM2022-01-19T19:59:37+5:302022-01-19T20:00:27+5:30
Nagpur News नागपूर मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांना राष्ट्रीय स्तरावरील साराभाई टीचर्स सायन्टिस्ट अवाॅर्ड मिळाला आहे.
नागपूर : टुमदार इमारत आणि प्रयोगशाळा नसतानाही उत्तम विज्ञान शिकविता येते. विज्ञानाला व्याख्येत बांधण्यापेक्षा प्रयोगात बांधण्याचे कसब असलेल्या मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांनी हे दाखवून दिले आहे. राष्ट्रीय स्तरावरील साराभाई टीचर्स सायन्टिस्ट अवाॅर्ड मिळवून नागपूर महापालिकेला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला आहे.
केंद्र सरकारच्या सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, रमण सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, नॅशनल काऊंसिल ऑफ टीचर्स सायन्टिस्ट, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल काऊंसिल ऑफ यंग सायन्टिस्ट या संस्थांद्वारे साराभाई टीचर्स सायन्टिस्ट अवाॅर्ड २०२१ साठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत २२ राज्यातून हजारो विज्ञानाच्या शिक्षकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात १०० गुणांचा ऑनलाईन पेपर घेण्यात आला. त्यातून पहिल्या २५ मध्ये बिस्ट यांची निवड झाली. दुसऱ्या टप्प्यात प्रोफाईल अपलोड करायची होती. त्याची स्क्रूटीनी होऊन पहिल्या दहामध्ये त्यांची निवड झाली. तिसऱ्या टप्प्यात प्रोफाईल प्रेझेन्टेशन आणि ज्युरीसमक्ष प्रश्नोत्तरे झाली. सहा महिन्याच्या कालावधीत स्पर्धेची ही प्रक्रिया पार पडली. बुधवारी सायंकाळी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यात मनपाच्या शिक्षिका दीप्ती बिस्ट यांच्या नावाची २०२१ चा साराभाई टीचर्स सायन्टिस्ट नॅशनल अवाॅर्डसाठी घोषणा करण्यात आली.
२५ वर्षांपासून मनपाच्या शाळेत विज्ञान शिक्षिका असलेल्या दीप्ती बिस्ट यांनी यापूर्वीही मनपाच्या विद्यार्थ्यांचे नाव विज्ञानाच्या क्षेत्रात राष्ट्रीयस्तरावर चमकविले आहे.
यापूर्वीही राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरी
- इन्स्पायरमध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रयोगांना तीनवेळा राष्ट्रीयस्तरावर निवडण्यात आले.
- नासाने मंगळ ग्रहावर सोडलेल्या यानावर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे नोंदविले नाव
- अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या फॅमटो सॅटेलाईट लाँचिंगमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग
- अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या रिसोर्स पर्सन
- राष्ट्रीयस्तरावर सादर केले पाच पेपर प्रेझेन्टेशन
- ‘नो कॉस्ट लो कॉस्ट’ सायन्स एक्सपर्ट
विज्ञान दररोज बदलत आहे. त्यात शिक्षकांना स्वत:ला सिद्ध करायचे आहे. अवाॅर्डसाठी झालेली ही स्पर्धा त्याची पावती आहे. हा अवाॅर्ड केवळ विज्ञान शिकविते म्हणून मिळाला नाही, तर विज्ञान कुठल्या परिस्थितीत शिकविता, शिकणारे विद्यार्थी कुठल्या परिस्थितीतील आहेत, हे महत्त्वाचे वाटते. विद्यार्थ्यांच्या भरारीचा आणि विज्ञान क्षेत्रातील कार्याबद्दलचा हा गौरव आहे.
- दीप्ती बिस्ट, विज्ञान शिक्षिका, मनपा सुरेंद्रगड हिंदी हायस्कूल