लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे अधिक आर्थिक अडचिणत सापडलेल्या नागपूरकरांना महापालिकेने दसरा गिफ्ट दिले आहे. शहरातील मालमत्ता व नळ धारकांकडे थकीत असलेल्या बिलावर आकारण्यात येणारा दंड (शास्ती) माफ करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त राधाकृष्ण बी. यांना गुरुवारी आॅनलाईन सभेत दिले. प्रशासनाने याची अंमलबजावणी केल्यास थकबाकीदारांना तब्बल २६३ कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.नागपूर शहरात ६ लाख ७५ हजार मालमत्ताधारक आहेत, तर जवळपास ३ लाख ६० हजार नळधारक आहेत. यात ५.६१ लाख थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ७७१ कोटींची थकबाकी आहे. ३ लाख ८७ लाख मालमत्ताधारकांकडे जवळपास ५७५ कोटी तर १ लाख ७५ नळधारकांकडे १९६ कोटींची थकबाकी आहे.
मालमत्ता कराची शास्ती माफ झाल्यास थकबाकीदारांना जवळपास १७५ कोटींची सवलत मिळणार आहे, तर नळधारकांना सुमारे ८८ कोटी माफ होतील, म्हणजेच एकूण २६३ कोटी माफ होतील. दुसरीकडे दंड माफ केल्यामुळे नागरिक पुढाकार घेऊन थकीत कर, पाणी बील भरतील व यातून तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वीॅही शास्तीमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे लाखो मालमत्ताधारकांकडे वषार्नुवर्षे थकबाकी बाकी आहे.