फहीम खान
नागपूर : नागपूर महापालिकेने खर्रा, पान खाऊन सार्वजनिक भिंती रंगविणाऱ्यांना रोखण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे. महापालिकेने त्यासाठी एक पोस्ट तयार केली असून, त्यावर ‘दीवार’ या सिनेमातील आयकॉनिक डायलॉग वापरला आहे. हा डायलॉग अमिताभ बच्चन व शशी कपूर यांच्यातील आहे. महापालिका या पोस्टमध्ये म्हणते ‘मेरे पास नागपूर की संतरा बर्फी है, सावजी मसाला है, तर्री पोहा है...’ तुम्हारे पास क्या है? या प्रश्नावर उत्तर आहे ‘मेरे मुँह में खर्रा है...’ त्याला उत्तर देताना मनपा म्हणते, ‘दीवार पर मत थुँकना....’ महापालिकेची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर सोशल मीडियाचे युजर्स कॉमेंट करीत आहेत. एका युजरने नागपूर महापालिकेला टॅग केले की, सार्वजनिक स्थळांवर थुंकणाऱ्यांकडून दंडच वसूल करू नका, त्याला घाणही साफ करायला लावा.
असे अनेक युजर्स मनपाला सल्ला देत आहेत. काहींनी त्या पोस्टवरून महापालिकेवर ताशेरेही ओढले आहेत. मनपाने स्वच्छतेकडे नियमित लक्ष द्यावे. यापूर्वी सोशल मीडियावर असाच प्रयोग नागपूर पोलिसांनी केला होता आणि त्यावर सोशल मीडियावर भरपूर चर्चाही रंगली होती. स्वच्छतेसाठी आता महापालिकेनेही वेगळ्या अंदाजात जनजागृती करण्यासाठी ही पोस्ट फाइल केली असून, सोशल मीडियावर तिची खूप चर्चा आहे.
महापालिकेने या पोस्टच्या माध्यमातून लोकांना ‘भिंतीवर थुंकू नका,’ असे आवाहन केले आहे. शहरात २० ते २१ मार्चदरम्यान जी-२० ची अंतर्गत २०-२० ची बैठक होणार आहे. त्यासाठी देश-विदेशांतून पाहुणे नागपुरात येणार आहे. दोन दिवस ते नागपुरात राहणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी सातत्याने बैठका घेऊन जी-२० च्या कामाचा आढावा घेत आहेत; तर दुसरीकडे नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. शहराचे सौंदर्य खुलविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांचेही सहकार्य मिळत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट
नागपूरचे प्रशासन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जोरकस प्रयत्न करीत आहे; परंतु हे सौंदर्य, स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी नागपूरकरांचे सहकार्य गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने वेगवेगळ्या पातळ्यांवर जनजागरण मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर महानगरपालिकेने जनजागृतीसाठी ही पोस्ट टाकली आहे.