नागपूर महापालिका मुख्यालयात शुकशुकाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:52 AM2018-08-21T00:52:21+5:302018-08-21T00:54:31+5:30
बिकट आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेत नागरिकांच्या समस्या मार्गी लागतीलच याची शाश्वती तर नाहीच, समस्या मांडायची कुणापुढे असा प्रश्न सोमवारी महापालिका मुख्यालयात येणाºया नागरिकांना पडला. सोमवार हा प्रशासकीय कामकाजाचा दिवस असल्याने अधिकारी व पदाधिकारी कार्यालयात उपस्थित असणे अपेक्षित होते. परंतु अधिकारी सुटीवर तर पदाधिकारी उपस्थित नसल्याने महापालिके त शुकशुकाट होता. कामानिमित्त येणाऱ्यांना खाली हाताने परतावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिकट आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेत नागरिकांच्या समस्या मार्गी लागतीलच याची शाश्वती तर नाहीच, समस्या मांडायची कुणापुढे असा प्रश्न सोमवारी महापालिका मुख्यालयात येणाºया नागरिकांना पडला. सोमवार हा प्रशासकीय कामकाजाचा दिवस असल्याने अधिकारी व पदाधिकारी कार्यालयात उपस्थित असणे अपेक्षित होते. परंतु अधिकारी सुटीवर तर पदाधिकारी उपस्थित नसल्याने महापालिके त शुकशुकाट होता. कामानिमित्त येणाऱ्यांना खाली हाताने परतावे लागले.
आयुक्त वीरेंद्र सिंह कौटुंबिक कारणाने रजेवर आहेत. प्रभारी अपर आयुक्त अजीज शेख आठ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. उपायुक्त संजय देवतळे मागील काही दिवसापासून दीर्घ रजेवर आहेत. त्यांनी सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांची औरंगाबाद येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या नवीन इमारतीत सोमवारी फक्त अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, उपायुक्त नितीन कापडनीस असे तीनच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाज ठप्पच होते. निर्णय प्रलंबित असल्याने फाईल्स टेबलावर पडून होत्या. वरिष्ठ अधिकारी नसल्याने वित्त विभागात सुनवाणी झाली नाही. तसेही वित्त विभागात फाईल्स मंजूर होत नसल्याने या विभागात आता पूर्वीसारखी वर्दळ राहिलेली नाही.
जुन्या इमारतीत महापौरांच्या कक्षात शुकशुकाट होता. महापौर नसल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचारी दिवसभर गप्पात होते. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्याही कक्षात दुपारनंतर शुकशुकाट होता. महापौर नंदा जिचकार व स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा एमएमआरडीएच्या बैठकीसाठी मुंबईला गेले होते. सत्तापक्ष नेत्यांच्या कार्यालयातही नगरसेवकांची वर्दळ नव्हती. कर्मचारीही उपस्थित नव्हते.
आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नागरिक कामानिमित्त मुख्यालयात आले होते. कनकचे कर्मचारी निवेदन देण्यासाठी आयुक्तांकडे आले होते. परंतु आयुक्त नसल्याने त्यांना अपर आयुक्तांना निवेदन द्यावे लागले. वरिष्ठ अधिकारी नसल्याने विभागातील अधिकारी कामावर असूनही कक्षात उपस्थित नसल्याचे चित्र होते.
महापालिकेची तिजोरी खाली असल्याचे अधिकारी व पदाधिकारी सांगत आहेत. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत महापौर नंदा जिचकार यांनीही याची कबुली दिली. यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असूनही आर्थिक स्थिती गंभीर असेल तर महापालिका तात्काळ बरखास्त करण्याचा प्रस्ताव आणा, अशी मागणी केली आहे.
आयुक्तांचा प्रभार कुणाकडे?
महापालिका आयुक्त रजेवर जाण्यापूर्वी त्यांचा प्रभार जिल्हाधिकारी, नासुप्र सभापती अथवा महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविला जातो. परंतु यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह याचा प्रभार कुणाकडे सोपविण्यात आला, याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे आयुक्तस्तरावरील निर्णय होऊ शकले नाही. तसेच आयुक्तांचा प्रभार सोपविला नसल्याने अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे चित्र बघायला मिळाले.